अधिकारी व रेशन दुकानदार पदाधिकार्‍यांची अभद्र युती
Featured

अधिकारी व रेशन दुकानदार पदाधिकार्‍यांची अभद्र युती

Sarvmat Digital

श्रीरामपुरात पदाधिकार्‍यालाच दुकानांचे वाटप

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गरिबांना रेशन धान्य मिळावे यासाठी सरकारने रेशनवर रास्त दरात धान्य वाटप सुरू केले. तसेच जवळच्या ठिकाणी ते मिंळावे यासाठी ठिकठिकाणी रेशन दुकाने सुरू झाली. पण श्रीरामपुरातील पुरवठा विभागातील काही अधिकारी आणि रेशनदुकान संघटनांच्या काही पदाधिकार्‍यांच्या अभद्र युतीने श्रीरामपूर शहरात तडा गेला आहे.

या पदाधिकार्‍याकडे अगोदर तीन दुकानांचे लाभर्थी असतानाही आणखी एक दुकान जोडण्यात आले आहे. तेही बचत गटांना डावलून. ऐनतपूर शिवारातील निलंबित असलेले रेशन दुकानाचे लाभार्थी शहरातील या पदाधिकार्‍यांच्या रेशन दुकानाला जोडण्यात आल्याने या रेशन दुकानदारांच्या नशिबी पुन्हा पायपीट येणार आहे. तसेच गायकवाड वस्तीवरील एक रेशन दुकान चक्क वळदगावला जोडण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थींना रेशनचा लाभ कसा मिंळणार असा सवाल करण्यात येत आहे.

एखादे निलंबित रेशन दुकान असेल तर ते लगतच्या रेशन दुकानास जोडले पाहिजे असा नियम आहे. पण या अधिकारी आणि रेशन दुकानदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी तो धाब्यावर बसविला आहे. अन्य काही दुकानदारांकडेही तीन-चार रेशन दुकानांचे लाभार्थी आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि पुन्हा या दुकानांचे जाहीरनामे काढण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

तहसीलदारांनी कारवाई करावी
पुरवठा विभागातील काही अधिकारी आणि रेशन दुकानदार पदाधिकार्‍यांची मनमानी सुरू आहे. बचत गटांना रेशन दुकान चालविण्यास द्यावेत असे सरकारचे धोरण आहे. काही बचत गटांनी अर्जही केले आहेत. त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन काहींचे अर्ज तोंडी आश्वासन देऊन नाकारले जातात. या सर्व प्रकाराची चौकशी तहसीलदारांनी करावी. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या प्रकारावरून एक काँग्रेसचा पदाधिकारी आणि अधिकार्‍यांमध्ये वादंग झाले. नियमबाह्य रेशन दुकान जोडल्याने या कार्यकर्त्याने अधिकार्‍यांना धारेवर धरून या प्रकाराचा जाब विचारला.

Deshdoot
www.deshdoot.com