शालेय पोषण आहार चोरून नेताना अंगणवाडी सेविका व मदतनीसास ग्रामस्थांनीच रंगेहाथ पकडले

शालेय पोषण आहार चोरून नेताना अंगणवाडी सेविका व मदतनीसास ग्रामस्थांनीच रंगेहाथ पकडले

संगमनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका अंगणवाडीमध्ये शालेय पोषण आहार चोरताना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रामस्थांनी पकडले. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला.

अंगणवाडीमधून शालेय पोषण आहार हंड्यामध्ये घेऊन जात असताना ग्रामस्थांनी पाहिले. त्यानंतर ग्रामस्थांनी घारगाव विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे, जवळेबाळेश्‍वरच्या पर्यवेक्षिका वंदना बांबळे यांना या घटनेची माहिती दिली. बालविकास प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

सदर कर्मचार्‍यांनी चोरून नेलेला लहान मुलांचा पोषण आहार प्रकल्प अधिकार्‍यांनी जप्त केला. त्याचा ग्रामस्थांसमोर पंचनामा केला. त्यानंतर अंगणवाडीमध्ये जाऊन आहाराची मोजदाद केली. सदर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी अंगणवाडीला कुलूप ठोकले.

हा प्रकार गंभीर असून याप्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर कारवाई करण्याचं आश्‍वासन बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे यांनी दिले.

जोपर्यंत या सेविका आणि मदतनीस यांची बदली होत नाही तोपर्यंत अंगणवाडी उघडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
अखेर ग्रामस्थ निर्णयावर ठाम राहिल्याने बाल विकाल प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे यांनी सांगितले की, सदर दोन्ही कर्मचार्‍यांची इतरत्र बदली करण्यात येणार आहे. त्यांच्या जागी दुसर्‍या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

लहान मुलांचा शालेय पोषण आहार नेताना गावातीलच महिलांना पकडले गेल्याने मोठे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पंचायत समितीचे सदस्य या अंगणवाडीकडे फिरकले देखील नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर निघतांना दिसून आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com