संगमनेर : 531 कच्ची घरे कोसळली
Featured

संगमनेर : 531 कच्ची घरे कोसळली

Sarvmat Digital

बोरबनमध्ये अंगावर भिंत कोसळून एक जखमी, 450 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

संगमनेर (प्रतिनिधी)- निसर्ग चक्री वादळाचा फटका संगमनेर तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील विविध गावांमधील सुमारे 531 कच्ची घरे कोसळली आहेत तर बोरबनमध्ये घराची भिंत अंगावर पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. आतापर्यंत सात जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे तर 450 हेक्टर क्षेत्रामधील फळपिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बुधवारी तालुक्यात जोरदार वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. वादळ सुरू झाल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. चक्री वादळ व पावसामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले, भिंती पडल्या, डाळिंबाचे फूल व फळ पडले, कणसे असलेली मक्याची झाडे वजनामुळे भुईसपाट झाली. जनावरांचे गोठे पडले, बहुतांशी गावांत विजेचे पोल पडले. मोठ मोठी झाडे रस्त्यावर कोसळली. कांद्याची शेड, शेतातील उभी पिके यांचे मोठे नुकसान झाले आहे. पठार भागातील बोरबनमध्ये चक्री वादळामुळे घराची भिंत कोसळून पांडुरंग भुतांबरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी 1 वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवा असे आवाहन केले होते. बुधवारी दुपारी 1 वाजेनंतर आकाशात ढगांनी गर्दी केली आणि गारवा सुटला. 3 वाजेच्या दरम्यान सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. 5.30 वाजता चक्री वादळाने आपले रौद्र रुप धारण केले. या सोसाट्याच्या वार्‍यामुळे तालुक्यातील सर्वच गावांमध्ये ठिकठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली.

अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले, जनावरांच्या शेडवरील पत्रे उडाले, काही ठिकाणी पोल पडले, खांडगाव शिवारात विजेचा पोल व एक मोठे झाड पडले. बोरबन येथे घराची भिंत पडून पांडुरंग भुतांबरे हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 531 कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे तर चार पक्की घरे आहेत. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी तलाठी, कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांना दिले आहेत.

सायखिंडी, संगमनेर खुर्द येथे नुकसान झालेल्या डाळिंब पिकांची पाहणी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील पाऊस
संगमनेर 55 मिमी, शिबलापूर 32 मिमी, पिंपरणे 25 मिमी, साकूर 23 मिमी, डोळासणे 36 मिमी, घारगाव 33 मिमी, आश्वी 32 मिमी, समनापूर 37 मिमी, धांदरफळ 55 मिमी, तळेगाव दिघे 24 मिमी.

Deshdoot
www.deshdoot.com