निळवंडेच्या प्रलंबित कालव्यांच्या कामास गती द्यावी

निळवंडेच्या प्रलंबित कालव्यांच्या कामास गती द्यावी
file photo

निळवंडे कालवा कृती समितीची मागणी

कोपरगाव (प्रतिनिधी) – उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 190 गावांना वरदान ठरणार्‍या व वर्तमानात मोठ्या गतीने सुरु असलेल्या ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प-2 निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम आता निधी संपत आल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हाती आली असून या प्रकल्पाला आता तरी राज्य शासनाने तातडीने 1100 कोटी रुपयांची तरतूद करून या पन्नास वर्षांपासून प्रलंबित कालव्यांच्या कामास गती द्यावी, अशी महत्वपूर्ण मागणी निळवंडे कालवा कृती समितीने एका निवेदनाद्वारे नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रकल्पाला पन्नास वर्ष उलटत आली आहे.मात्र तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. कालव्यांची कामे आधी होणे अभीप्रेत असताना येथे धरणाची भिंत आधी व कालवे पन्नास वर्षातही होऊ शकले नाही. त्यामुळे या प्रस्तावित लाभक्षेत्राखालील 190 (अकोलेतील 8 गावांची वाढ धरून) दुष्काळी गावातील जवळपास 68 हजार 800 हेक्टर क्षेत्र शेती सिंचना पासून वंचित राहिले आहे. या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम जवळपास पन्नास टक्के बाकी आहे. त्यासाठी 1100 कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता आहे.

महाआघाडीच्यावतीने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यावर नाशिक येथे मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय पूर्व बैठकीत या प्रकल्पाचे कालवे करण्यासाठी 1100 कोटी रुपये तरतूद करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अर्थसंकल्पात केवळ 105 कोटी रुपये अल्पस्वल्प तरतूद केल्याचे केवळ ऐकीवात आहेे. प्रत्यक्षात कागदावर अद्याप तरतुद दिसत नाही त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांत मोठी नाराजी पसरली आहे. वर्तमान स्थितीत कालव्यांची कामे वेगाने सुरु असताना आता निधी संपुष्टात आला आहे. कामे अल्पावधीत बंद पडणार आहे.

याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत (133/2016) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे लेखी हमी दिलेली आहे. त्यामुळे आपण जाहिर केल्याप्रमाणे या प्रकल्पाला तातडीने 1100 कोटी रुपयांची तरतुद करावी, अशी मागणी समितीचे नानासाहेब जवरे यांनी शेवटी केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com