Friday, April 26, 2024
Homeनगरनव्या वर्षात कमिशन एजंटांची साडेसाती संपवणार

नव्या वर्षात कमिशन एजंटांची साडेसाती संपवणार

शनैश्‍वर देवस्थानचा निर्णय; भाविक व ग्रामस्थांकडून स्वागत

सोनई, शनीशिंगणापूर (वार्ताहर)- शनीशिंगणापूर येथील कमिशन एजंटांची साडेसाती संपवण्याचा तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा देवस्थानाने क्रांतिकारी निर्णय घेतला असून त्याचे शनी भक्तांकडून स्वागत होत आहे.

- Advertisement -

राज्यातील तसेच देशातील अनेक शनीभक्तांना कमिशन एजंटांनी त्रास दिला आहे. याबाबतच्या विविध तक्रारी शिंगणापूर पोलीस ठाणे व देवस्थानमध्ये झालेल्या आहेत. यामुळे भाविकांचा ओघ कमी झाला तसेच गावातील शांतता भंग पावली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून गावात तिनशेहून अधिक तर राहुरी आणि घोडेगाव रस्त्यावर व्यावसायिकांचे दोनशेहून अधिक लटकू वाहनांचा पाठलाग करून व गावात वाहने अडवून शनिभक्तांना महागडे पूजा साहित्य घेण्यास सक्ती करण्याचे प्रकार करत आहेत. भाविकांना दमदाटी, शिवीगाळ, फसवणूक व प्रसंगी मारहाण करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. हाच प्रकार देवस्थानचे नाव खराब होण्यास कारणीभूत ठरून अलिकडच्या दोन-तीन वर्षात दर्शनासाठी गर्दी कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या सुचनेनुसार विश्वस्त, कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिक यांची बैठक घेतली व त्यात मार्गदर्शन करताना सांगितले होते की देवस्थानची कुणीही उठसूट बदनामी करत होते. यामुळे देवस्थान, गाव बदनाम होत आहे. येथे कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता देशातील भाविक कसे शिंगणापुरात येतील व त्यांना कशा चांगल्या पद्धतीने सुविधा आपल्याला देता येतील यावर सर्वांनी मिळून लक्ष देणे गरजेचे आहे .

शिंगणापूर प्राथमिक शाळा ते शिवांजली चौक या रस्त्यावर फेरीवाले, काकडी दुकानदार, पूजा साहित्य व्यावसायिक रस्त्यांवर बसत असल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे यात मोठी वाढ होत आहे. देशभरातून आलेल्या शनी भक्तांमधून मोठी नाराजी यामुळे होत होती.

गेल्या 10 -15 वर्षांपासून कमिशन एजंटचा त्रास होत असून लटकू हटाव ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिंगणापूर पोलीस ठाण्याला चांगला अधिकारी नेमण्याची मागणी जोर धरत असून सध्याचे अधिकारी शनी भक्तांना सुरक्षा देण्याऐवजी लटकूंना सुरक्षा देत असून देवस्थान व पोलीस अधिकारी यांच्यात समन्वय दिसत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या