Thursday, April 25, 2024
Homeनगर52 दिवसानंतर नेवाशातील दुकाने आज उघडणार

52 दिवसानंतर नेवाशातील दुकाने आज उघडणार

मुख्याधिकार्‍यांनी जाहीर केले दिवसाआड दुकाने सुरु ठेवण्याचे नियोजन

नेवासा (तालुका वार्ताहर)- 52 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आजपासून नेवासा शहरातील दुकाने शासकीय नियम पाळून सुरू होणार आहेत. नगरपंचायत मुख्याधिकारी समीर शेख यांनी तसा आदेश जारी केला आहे. शहरातील दुकाने सुरु करावी यासाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, अंबादास इरले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यानंतर दिवसाआड दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

प्रत्येकाने या अटी व शर्तीचे पालन करणे गरजेचे आहे. ग्राहकांनी तोंडावरती मास्क बांधलेला असेल तरच त्यांना खरेदीसाठी प्रवेश द्यावा, दुकानांमध्ये एका वेळी फक्त पाच ग्राहक खरेदीसाठी सोडण्यात यावे.

दुकानाच्या प्रवेश द्वारावर शक्यतो ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगची सुविधा करण्यात यावी, दुकानात प्रवेशावेळी सर्व ग्राहकांना हॅण्डवॉश व सॅनिटायझरची सुविधा करण्यात यावी, होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, शक्यतो 5 वर्षापर्यंत व 60 वर्षावरील व्यक्तींना दुकानात प्रवेश देण्याचे टाळावे, कामगारांच्या एकूण क्षमतेच्या 33 टक्के कामगारांचा वापर करावा, दुकान मालक व कामगार यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सर्व आस्थापना यांनी त्यांच्या दुकानात एक रजिस्टर ठेवावे.

त्यामध्ये येणार्या ग्राहकांची संपूर्ण माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. अटी व शर्तींचे पालन न करणार्‍या अस्थापना तात्काळ बंद करण्यात येऊन त्यांच्या विरोधात दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहा कॉफीची दुकाने, रसवंती, शीतपेय, भेळ, वडापाव व इतर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्या आदी दुकाने बंद राहणार आहेत.

सोमवार बुधवार शुक्रवार
नगरपंचायत चौक ते सेंट्रल बँक पर्यंत उजवी बाजू, प्रवरा फुल ते खोलेश्वर गणपती मंदिर डावी बाजू, नगरपंचायत चौक ते हेडगेवार चौक ते भरव गणपती चौक उजवी बाजू, वाखुरे चौक ते हेडगेवार चौक ते मुथा मेडिकल ते औदुंबर चौक उजवी बाजू या दुकाना सुरु राहतील तर

मंगळवार, गुरुवार व शनिवारी नगरपंचायत चौक, सेंट्रल बँक पर्यंत डावी बाजू, प्रवरा पूल ते खोलेश्वर गणपती मंदिर उजवी बाजू, नगरपंचायत चौक ते हेडगेवार चौक ते भरव गणपती चौक डावी बाजू, वाखुरे चौक ते हेडगेवार चौक ते मुथा मेडिकल ते औदुंबर चौक डावी बाजू ही दुकाने चालू राहतील. रविवारी हॉस्पिटल व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या