नेवासा-शेवगाव रस्ता दुरुस्तीसाठी भानसहिवरेत रास्ता रोको
Featured

नेवासा-शेवगाव रस्ता दुरुस्तीसाठी भानसहिवरेत रास्ता रोको

Sarvmat Digital

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा-शेवगाव राज्यमार्गाची मोठी दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे पडल्यामुळे अनेक जणांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ काल गुरुवारी सकाळी 10 वाजता भानसहिवरे येथे एक तास सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नेवासा-शेवगाव रस्त्याची मोठी दुर्दशा झालेली असून या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केली व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करण्याचे आव्हान दिले. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेकांना कायमचे अपंगत्व व काहींना मृत्यूलाा सामोरे जावे लागले.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते अपघाताची दखल घेणार नसेल तर होणार्‍या अपघातातून मृत्यू पावणार्‍या इसमाचा गुन्हा बांधकाम खात्याविरुद्ध दाखल करण्याचा इशारा यावेळी त्यांनी देऊन जर रस्ता दुरुस्तीसाठी विलंब केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

साखर कारखाने सुरू असल्यामुळे डबल ट्रॉली ऊस वाहतुकीमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने ही वाहतूक बंद करण्याची मागणी या रस्ता रोको प्रसंगी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार परदेशी व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी बैठक घेऊन ऊस वाहतुकीवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी करून दुचाकीस्वरांनी स्वसंरक्षणार्थ हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला.

सुमारे एक तास सुरु असलेल्या रस्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात ग्रामस्थांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे, हवालदार ठोंबरे, सहायक फौजदार घुगरकर यांनी रस्ता वाहतूक सुरळीत केली.

बांधकाम खात्याचे श्री. खामकर यांनी रस्ता दुरुस्तीचे काम दोन दिवसांत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मोहिटे, संदीप क्षीरसागर उपसरपंच अय्याज देशमुख, अनिल वंजारे, किरण शेरे, विजय शेरे, अविनाश चव्हाण, संतोष राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवीण वंजारे, बाबासाहेब ढवाण, मच्छिंद्र ढवाण, सिमोन मकासरे, लक्ष्मण राजगिरे, पोपट शेकडे, सागर नाळे, संदीप तळपे, अमोल गुजर, चांगदेव दारुंटे, संजय तुपे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी आमदारही आंदोलनात सहभागी…
या रस्ता रोकोप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, पाटपाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. रस्त्याची समस्याही गंभीर असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com