Wednesday, April 24, 2024
Homeनगरप्रवरा नदीवरील 15 बंधार्‍यांत सोडले दोन टीएमसी पाणी

प्रवरा नदीवरील 15 बंधार्‍यांत सोडले दोन टीएमसी पाणी

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या प्रयत्नातून नेवाशातील मध्यमेश्वर बंधार्‍यात पाणी दाखल

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- अकोले, संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातील बंधारे भरण्यासाठी भंडारदरा व निळवंडे धरणातून जवळपास दोन टीएमसी (1900 दशलक्ष घनफूट) पाणी सोडविण्यात आले असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली. हे पाणी प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशातील मध्यमेश्वर बंधार्‍यात पोहचले असून बंधारा जवळपास 70 टक्के भरला आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या प्रयत्नातून एकाचवेळी सर्व बंधारे भरले जात आहेत.

- Advertisement -

प्रवरा नदीपात्रातील सर्व बंधारे भरून द्यावीत अशी आग्रही मागणी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेकडे केली होती. त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आदेशाने दि. 1 एप्रिल रोजी भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. ते पाणी दि. 15 रोजी नेवासा येथील मध्यमेश्वर बंधार्‍यात पाणी दाखल झाले. मध्यमेश्वर हा प्रवरा नदी पात्रातील शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा दि.17 एप्रिल अखेर पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

प्रवरा नदीपात्रातील बंधारे भरण्याचे कामी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार डॉ. किरण लहामटे यांचेही सहकार्य लाभले.

भंडारदरा धरणातून प्रवरा कालव्यातून शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन दि.7 मार्च पासून सुरू होते. त्यातूनच दि.1 एप्रिल पासून प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरण्यास सुरुवात झाली.त्याकरिता आज अखेर प्रवरा कालवा आवर्तनासाठी 3300 दलघफू तर बंधार्‍यांमध्ये 1900 दलघफू असे एकूण 5200 दलघफू पाणी वापरले गेले.

यासाठी भंडारदरा धरणातून 3400 दलघफू तर निळवंडे मधून 1800 दलघफू पाणी घेण्यात आले. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी सोडलेल्या पाण्यातून आश्वी, चणेगाव, रामपूर, गळनिंब, मांडवे, कोल्हार, केसापूर, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, पाचेगाव, पुनतगाव, मध्यमेश्वर हे सर्व 15 बंधारे भरण्यात आले. हे सर्व बंधारे आज गुरुवारअखेर 70 टक्क्यांहून अधिक भरली आहेत.

सध्याचा तीव्र उन्हाळा व खालावलेली पाणी पातळी लक्षात घेता अकोले, संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात येणारे नागरिक व शेतकर्‍यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पाण्यासाठी महत्वाचे असलेले कोल्हापुरी पद्धतीचेही बंधारे भरून भरले जात असल्याने जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन बोअर-विहिरींचे पाणी वाढण्यास मदत होऊन शेतात उभी असलेली पिके, जनावरांसाठीचे चारा पिके वाचतील तसेच माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना सर्वस्तरातून धन्यवाद देण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या