Saturday, April 27, 2024
Homeनगरबचत गटाच्या महिलांनी गावठी दारु अड्डा केला उद्ध्वस्त

बचत गटाच्या महिलांनी गावठी दारु अड्डा केला उद्ध्वस्त

नेवासा तालुक्यातील मुकिंदपूरची घटना

नेवासाफाटा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर ग्रामपंचायत हद्द व नेवासा फाटा परिसरातील झोपडपट्टीत एक महिला चालवित असलेले गावठी हातभट्टी दुकान स्थानिक महिला बचत गटाच्या सदस्यांनी उद्ध्वस्त केले. महिला बचत गटाच्या सुमन इंगळे, प्रभावती बोर्डे यांच्यासह शेकडो महिलांनी तसेच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या पथकाने ही गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली.

- Advertisement -

परिसरातील महिलांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. पोलिसांबाबत ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती असल्याची भावना येथील महिलांनी व्यक्त केली. या परिसरात गावठी दारूच्या हातभट्ट्या चालू असूनही पोलिसांना याबाबत कल्पना कशी नाही? असा सवाल येथील महिलांनी यावेळी उपस्थित केला.

नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, होमगार्ड मोहन गायकवाड, कॉन्स्टेबल महेश कचे, वसिम इनामदार यांनी घटनास्थळी येऊन सदर दारू बनवण्याचे मोठाले बॅरल उद्ध्वस्त करून सर्व दारु नष्ट केली.

घराच्या कडेला खड्डा करून एक टीपाड दारू तयार करण्याकरिता लागणारे रसायन पुरलेले मिळून आले. 3 हजार 500 रुपये किमतीची 35 लिटर दारू उग्र वासाची त्याची किंमत 100 रुपये प्रति लिटरप्रमाणे, 800 रुपयांची प्लास्टिकच्या पिशवीत भरलेली दारू, 150 लिटर दारूसाठी लागणारे कच्चे रसायन असा एकूण 7 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत वसीम इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेखा अरुण चव्हाण व लक्ष्मीबाई अशोक पिंपळे या दोन महिलांविरुद्ध 328, 188, 269, 270 सह मुंबई प्रोव्हिशन ऍक्ट कलम 65 (ई), (ब), (क), (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बाळकृष्ण ठोंबरे करीत आहे. यावेळी मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, पोलीस पाटील, आदेश साठे यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या