मानाच्या झेंडा व पालखी मिरवणुकीने नेवासा नगरी गजबजली
Featured

मानाच्या झेंडा व पालखी मिरवणुकीने नेवासा नगरी गजबजली

Sarvmat Digital

नेवासा बुद्रुकहून झेंडा मिरवणूक

नेवासा (शहर प्रतिनिधी) – श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त पहिला झेंडा लावण्याचा मान नेवासा बुद्रुक येथील कुटे पाटील परिवाराला परंपरेने असून श्री मोहिनीराजांच्या यात्रोत्सवानिमित्त या मानाच्या असलेल्या झेंडा मिरवणुकीस नेवासा बुद्रुक येथील त्यांच्या निवासस्थानापासून प्रारंभ झाला.

यावेळी सिद्धेश्वर मंदिराचे बालब्रह्मचारी महाराज तसेच झेंड्याचे मानकरी संजय एकनाथ कुटे पाटील, मोहनराव कुटे, विलास कुटे, राजेंद्र कुटे, सत्यवान कुटे, विठ्ठल कुटे यांच्याहस्ते झेंड्याची पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

सुवासिनींनी पंचारती ओवाळून श्रीमोहिनीराजांच्या मानाच्या ध्वजाची पूजा केली. नेवासा बुद्रुक येथील विद्यार्थिनींच्या लेझीम तसेच ढोल आणि बँड पथकाने वाजत गाजत झेंडा मिरवणूक नेवासा बुद्रुक येथून नेवासा शहरात आली. मिरवणुकीत विश्वेश्वर नाथबाबा विद्यालयाच्या मुलींचे लेझीम पथक सर्वांचे आकर्षण ठरले. मिरवणुकीचे चौकाचौकांत तोफांची सलामी देत स्वागत करण्यात आले.

यावेळी नेवासा बुद्रुकच्या सरपंच प्रज्ञा सोनटक्के, संभाजी ठाणगे, प्रकाश सोनटक्के, अजित जाधव, नवनाथ मारकळी, माजी सरपंच बाबा कांगुणे, सतीश भाकरे, राजेंद्र थावरे, कुटे परिवारातील संतोष कुटे, प्रकाश कुटे, शशीराव कुटे, किरण कुटे, राहुल कुटे, तुषार कुटे, अशोक कुटे यांच्यासह नेवासा बुद्रुकचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदारांच्याहस्ते अभिषेक

नेवासा (शहर प्रतिनिधी) – येथील ग्रामदैवत श्रीमोहिनीराज यात्रा उत्सवात सोमवारी पहाटे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी मानाचा अभिषेक केला. नेवासा बुद्रुक येथील कुटे परिवाराच्यावतीने पहिला मानाचा झेंडा श्रीमोहिनीराज मंदिर शिखरावर लावण्यात आला आणि उत्सव मूर्ती पाच दिवसांच्या मुक्कामासाठी पाकशाळेत गेली.

यात्रेनिमित्त सोमवारी पहाटे तहसीलदार रुपेश सुराणा व सेजल सुराणा यांनी ग्रामदेवतेला अभिषेक केला. दुपारी मंदिरातून उत्सव मूर्ती पालखीतून वाजत गाजत पारंपरिक मार्गाने प्रवरा नदीकाठी पाकशाळा येथे आणण्यात आली. या मिरवणुकीत भजनी मंडळ व सनई चौघडा तसेच बदामबाई विद्यालयाचे लेझीम पथक सहभागी झाले होते. मिरवणुकीचे वाटेवर असलेल्या घरांमधून महिलांनी देवाला औक्षण केले व दर्शन घेतले.

पालखी जिल्हा परिषद मुलींच्या शाळेजवळ आली असता मुलींनी स्वागत करून दर्शन घेतले. यात्रेच्या पाच दिवसांत देवाचे सर्व जाती-धर्माच्या भक्तांसाठी हात लाऊन दर्शन घेता यावे यासाठी मोहिनीराज देवळातून बाहेर येऊन प्रवरेच्याकाठी पाक शाळेत मुक्कामाला असतात. यात्रेमध्ये पाच दिवस सायंकाळी हजारो भाविकांसाठी प्रसादाच्या पंगती उठतात. त्याचबरोबर रात्री मंदिरासमोर किर्तनाचा कार्यक्रम होतो.

Deshdoot
www.deshdoot.com