कचरा गाड्या नगरपंचायतीत नेवून नेवाशात चार तास ठिय्या आंदोलन

कचरा गाड्या नगरपंचायतीत नेवून नेवाशात चार तास ठिय्या आंदोलन

नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा शहरातील कचरा आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असून विविध आंदोलनानंतर ही नगरपंचायत प्रशासनाला जाग न आल्याने शहर स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना शनिवारी सामाजिक कार्यकर्ते संजय सुखधान यांनी स्व खर्चाने शहरातील कचरा गोळा करत नगरपंचायत कार्यालय आवारात आणला असता मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांना व कर्मचार्‍यांना बरोबर घेऊन चार तास ठिय्या आंदोलन केले. तर रात्री उशिरा अधिकारी न आल्याने मुख्याधिकारी, नगराध्यक्षा पती व उपनगराध्यक्षांच्या प्रतिकात्मक पुतळे बनवून ‘मुस्काड झोडो’ आंदोलन करण्यात आले.

गेली 15 दिवसांपासून शहरातील कचरा संकलन करण्यासाठी येणार्‍या घंटागाड्या बंद आहे. त्यामुळे शहरातील कचरा रस्त्यावर अथवा इतरत्र टाकल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि रोगराई पसरत आहे. या अगोदर स्वच्छतेसाठी सुखधान यांनी दोन वेळेस आंदोलने केली. परंतु नगरपंचायत प्रशासनाकडून त्याच्यावर तोडगा काढण्यात आला नाही.

जोपर्यंत नगरपंचायत मार्फत कचरागाड्या संकलनसाठी येऊन कचरा संकलन करत नाही आणि स्वच्छतेच्या इतर सेवा दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही नेवासकरांच्या वतीने स्वखर्चाने घंटागाड्या चालवून कचरा संकलन करून तो नेवासा नगरपंचायतमध्ये आणून टाकणार असल्याचे सुखधान यांनी निवेदनात म्हटले आहे.

शनिवारी सकाळी सुखधान यांनी शहरातील कचरा उचलण्यासाठी पाच घंटागाड्या आणल्या त्याचे उदघाटन नागरिक व व्यापार्‍यांनी करत शहरातील कचरा गोळा करण्यात आला. दरम्यान मुख्याधिकारी यांनी आंदोलनाबाबत सुखधान यांच्यासोबत चर्चा केली. दुपारी दोन वाजेपर्यंत मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचे संजय सुखधान यांनी सांगितले मात्र कुठलीही उपाययोजना न झाल्याने दुपारी चार वाजता नागरिक, खाजगी कर्मचारी व तरुणांना बरोबर घेत जमा केलेला कचर्‍याच्या गाड्या नगरपंचायत जवळ नेऊन नगरपंचायत कार्यालयात दुपारी चार वाजता ठिय्या आंदोलन सुरू केले.

चार तास उलटूनही मुख्याधिकारी न आल्याने प्रश्न मार्गी लागला नाही. दरम्यान रात्री आठ वाजता मुख्याधिकारी, नगराध्यक्षा पती व उपनगराध्यक्षांचे प्रतिकात्मक पुतळे बनवून ‘मुस्काड झोडो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजीक कार्यकर्ते अमृत फिरोदिया, सतिष गायके, गफूर बागवान, मुक्तार शेख यांच्यासह शहरातील महिला,तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वच्छतेप्रश्नी नगरपंचायत कार्यालयातील ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली.मात्र आंदोलन सुरूच असल्याने पुढील निर्णय मुख्याधिकारी घेतील.
-रवींद्र गुप्ता, कार्यालयीन अधीक्षक

दहा दिवसापासून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून आम्ही या अगोदर दोन वेळेस आंदोलन केले असताना नगरपंचायत प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्याने शनिवारी शहरातील कचरा स्वखर्चाने जमा करून नगरपंचायत येथे आणला मात्र चार वाजता सुरू झालेले आंदोलनाला चार तास उलटूनही मुख्याधिकारी, नगराध्यक्षा तसेच नगरसेवक न आल्याने शेवटी प्रतिकात्मक पुतळे बनवून ‘मुस्काड झोडो’ आंदोलन करण्यात आले.
– संजय सुखधान, आंदोलक

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com