नेवाशाचा एक, जामखेडच्या दोघांना डिस्चार्ज

नेवाशाचा एक, जामखेडच्या दोघांना डिस्चार्ज

44 करोना बाधित रुग्णांपैकी 28 रुग्ण कोरोना मुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना बाधित असलेल्या नेवासा येथील एक आणि जामखेड येथील दोघा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 28 झाली आहे. जिल्ह्यातील 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. नेवासा येथील व्यक्ती करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र 14 दिवसानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर सात दिवसांनी त्याचे अहवाल घेण्यात आले. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

तसेच जामखेड येथील दोन्ही व्यक्तींना काल डिस्चार्ज देण्यात आला. हे दोन्ही रुग्ण जामखेड येथील कोरोना बाधित मृत व्यक्तीचे मुले आहेत. त्यांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 44 असून त्यापैकी आता 28 रुग्ण करोनामुक्त होऊन परतले आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित 23 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत आणखी 18 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 1 हजार 644 व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी 1 हजार 555 जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com