नेवासा तालुका आरोग्य सर्व्हेत आढळले ‘सारी’चे दोन रुग्ण
Featured

नेवासा तालुका आरोग्य सर्व्हेत आढळले ‘सारी’चे दोन रुग्ण

Sarvmat Digital

नेवासा (तालुका वार्ताहर)- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेवासा नगरपंचायत व तालुक्यातील 130 गावांची घरोघर तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सर्व्हे झाला आहे. या तपासणीत सारीचे दोन संशयित तर करोनाचा प्रादुर्भाव असल्याचे कोणीही आढळून आलेले नाही. तालुक्याची आरोग्य तपासणीची पहिली फेरी उद्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना राबवली जात आहे. आरोग्य विभागातील आशाताई व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरांत सर्वेक्षण करून ताप, खोकला असलेले रुग्ण शोधून त्यांना आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मागील सहा दिवसांपासून या तपासणीला सुरुवात झाली. सहा दिवसांत घरोघरी जाऊन गावागावांत सर्व्हे केला जात आहे. यामध्ये नेवासा शहरापासून सुरुवात करण्यात आली. नेवासा नगरपंचायत व 130 गावांतील घरांचा येणार सर्व्हे करण्यात आला. यादरम्यान 3 लाखांच्यावर नागरिकांच्या आरोग्यबाबत माहिती घेण्यात आली. टोका, सलाबतपूर, शिरसगाव, कुकाणा, चांदा, उस्थळदुमाला, सोनई, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 278 जणांच्या पथकाने 3 लाखांच्यावर नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे.

या सर्व्हेत ‘सारी’चे दोघे संशयित रुग्ण आढळले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इन्फ्लुएन्झा सदृश 140 जण आढळले आहेत. तालुक्यात घरोघरी जाऊन आशाताई व अंगणवाडी कर्मचार्‍यांनी घरोघरी भेटी देऊन सर्व्हे केला आहे. नेवासा तालुक्यात सद्य स्थितीत करोना विषाणू संसर्गाने बाधित नवीन एकही रुग्ण नाही. करोना सारखी महाभयंकर महामारी तालुक्यात पसरू नये म्हणून आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे.

नेवासा हॉटस्पॉटचा आज शेवटचा दिवस
नेवासा येथे करोनाचा रुग्ण आढळल्याने हॉटस्पॉट घोषित करण्यात आले होते. हा कालावधी सुरू असतानाच आणखी एक रुग्ण आढळल्याने कालावधीत आणखी 8 दिवसांची वाढ केल्याने तो उद्या सोमवार दि. 27 रोजी सकाळी 6 पर्यंत आहे. म्हणजे आज हॉटस्पॉटचा शेवटचा दिवस आहे. हॉटस्पॉट कालावधी संपला तरी लॉकडाऊन 3 मे पर्यंत असणार आहे. मात्र हॉटस्पॉट कालावधीची बंधने शिथील होतील. विशेषतः या क्षेत्रातून कोणतीच वाहने जाऊ शकत नव्हती. ती उद्या सकाळपासून जाऊ शकतील. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहून लोक त्यासाठी बाहेर पडून खरेदी करू शकतील.

Deshdoot
www.deshdoot.com