नेवाशातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या लवकरच निवडणुका

नेवाशातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या लवकरच निवडणुका

बिगुल वाजले; 59 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरील आरक्षण सोडती जाहीर

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील 290 सहकारी संस्थांपैकी दोन साखर कारखान्यांसह जवळपास 116 सहकारी संस्थांच्या निवडणुका यावर्षी होणार असतानाच निम्म्यापेक्षा अधिक संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही मे मध्ये होणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचना आरक्षण सोडती जाहीर होत आहेत. तालुक्यात असलेल्या 127 गावांच्या एकूण 114 ग्रामपंचायतींपैकी 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रभाग रचना आरक्षणाच्या सोडती काढल्या गेल्या असून 14 फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती घेता येणार आहेत.

नेवासा तालुक्यात 127 गावे असून त्यात 114 ग्रामपंचायती व एक नगरपंचायत आहे. या 114 ग्रामपंचायतींपैकी 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यकाल यावर्षी म्हणजे 2020 मध्ये संपत आहे. निवडणुका होणार्‍या या ग्रामपंचायतींची संख्या निम्म्याहून अधिक असून तालुक्यातील जवळपास दोन लाख लोकसंख्या या 59 ग्रामपंचायतींमध्ये आहे.

यावर्षी निवडणुका होणार्‍या गावांमध्ये सोनई, चांदा, भेंडा बुद्रुक, खरवंडी, कुकाणा, सलाबतपूर, बेलपिंपळगाव, घोगरगाव, शिंगणापूर, प्रवरासंगम या प्रमुख गावांचा समावेश आहे.

सोनई, चांदा, भेंडा बुद्रक ही 17 सदस्यांच्या ग्रामपंचायतीची मोठी गावे आहेत. त्या खालोखाल मोठ्या गावांमध्ये 15 सदस्यांच्या खरवंडीचा व त्यानंतर 13 सदस्यांच्या कुकाणा, सलाबतपूर, बेलपिंपळगाव या गावांचा समावेश आहे.

दोन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांसह 116 सहकारी संस्थांच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत. त्यापैकी दोन कारखान्यांसह 74 सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका मार्च अखेरपर्यंत होणार होत्या. मात्र त्यांना तीन महिन्यांची स्थगिती दिल्याने या संस्थांच्या निवडणुका जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.

आता 114 ग्रामपंचायतींपैकी 59 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने तालुका निवडणुकांनी ढवळून निघणार आहे. सोसायट्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी त्या सर्व यावर्षीच होणार असल्याने हे संपूर्ण वर्ष नेवासा तालुक्यासाठी निवडणुकांचेच ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com