नेवासा शहर व परिसरात तिसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त बंद

नेवासा शहर व परिसरात तिसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त बंद

नेवासा (शहर प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन करत शहर व परिसरात तिसर्‍या दिवशीही व्यापार्‍यांनी व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले. गुरुवारी सायंकाळपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता शहरातील दुकाने बंद असल्याचे पाहायला मिळाले. व्यवहार बंद जरी ठेवले असले तरी अनेक नागरिक चौकाचौकात एकत्र येऊन गप्पा मारताना दिसत होते. त्यांनाही समज देण्याचे काम प्रशासन करत होते.

शासकीय कार्यालयात व अत्यावश्यक सेवा असलेल्या मेडिकल, बँक, भाजीपाला मार्केटकडेही नागरिकांनी जाळे टाकल्याने दिवसभर या ठिकाणीही शुकशुकाट जाणवत होता तर मुख्य रस्त्यावरही वाहनांची वर्दळ दिसत नव्हती. नागरिक बाहेर पडताना रुमाल, मास्कचा वापर करताना दिसत आहेत.

नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने जनजागृतीसाठी शहरात लाऊडस्पीकरद्वारे माहिती देण्यात आली तर आज होणार्‍या जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले. शहरात औषध फवारणी करण्याचे काम हाती घेतले आहे.

शहरातील नागरिक व्यवसाय बंद करून ग्रुप करून कट्ट्यावर बसत आहेत. ‘बंद’चा अर्थ व्यवसाय बंद करून गावात कुठेही गर्दी करायची नाही. नागरिकांनी आपापल्या घरात सुरक्षित बसायचे आहे. प्रशासनाची सूचना येत नाही तोपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिकांनी दुकाने उघडू नयेत अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असे आवाहन तहसीलदा रूपेश सुराणा यांनी केले.

नेवासा व परिसरातील 30 हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सुर्यवंशी यांनी दिली. आज तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालये व 9 प्राथमिक आरेग्य केंद्रांचे कर्मचारी जनजागृती करणार असल्याचेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com