Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यातील सर्व देशी दारु व बियर शॉपी दुपारनंतर झाल्या सुरु

नेवासा तालुक्यातील सर्व देशी दारु व बियर शॉपी दुपारनंतर झाल्या सुरु

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असल्याने नेवासा तालुक्यातील देशी दारू दुकाने व बिअर शॉपी दि. 5 पासून सुरू झाली आहेत. मात्र तालुक्यात एकही वाईन शॉपी नसल्याने आणि परमीट रूमला परवानगी नसल्याने नेवासा तालुक्यातील तळीराम विदेशी दारूला मुकणार आहे.

नगर जिल्ह्यातील दि. 5 मे पासून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दशी दारू, बिअर शॉपी व वाईन शॉपी दुकाने उघडी राहणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून दुकाने सुरु करण्याचा आदेश जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगरचे अधीक्षक पराग नवलकर यांनी सोमवार दि. 4 मे रोजी सायंकाळी काढले. त्यानुसार मंगळवार दि.5 मे पासून सकाळी दहापासून जिल्ह्यातील वरील प्रकारातील दारुची दुकाने सुरू झाली आहेत. विदेशी दारू विक्री करणारे परमीट रूम असलेल्या हॉटेल्सना दारू विक्रीची परवानगी अद्याप दिलेली नाही.

- Advertisement -

नेवासा तालुक्यात 12 देशी दुकाने व 13 बिअर शॉपी आहेत. मात्र एकही वाईन शॉपी नाही. त्यामुळे ही दुकाने सुरू केली असली तरी मद्यपीना केवळ देशी दारू व बियरच मिळणार आहे. हायटेक तळीरामांना विदेशी दारूला मात्र काही दिवस तरी मुकावे लागणार आहे. नेवासा तालुक्यातील देशी दारू दुकाने, बिअर शॉपी व वाईन शॉपी या दुकानांचे परवाने नुतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली.

त्यामुळे तालुक्यातील दुकाने दि. 5 रोजी दुपारी उशीरानंतर सुरू झाली. भेंडा येथील देशी दारू विक्रीचे दुकान मंगळवारी दुपारी 4 वाजे पासून सुरू झाले.दारू विक्री करताना दोन ग्राहकांमध्ये 10 फुटाचे सोशल डिस्टन्स ठेवण्यात आले. विक्री खिडकी जवळ जाण्यापूर्वी हात धुण्यासाठी हॅण्डवॉशचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

तळीरामांना बंदोबस्त देण्याची पोलिसांवर वेळ
नगर जिल्ह्यात एफएल 2 परवानाधारक 42 दुकाने, एफएलबीआर 2 परवानाधारक 100 दुकाने, एफएल डब्लू 2 परवानाधारक 1 दुकान व सीएल 3 परवानाधारक (देशी) 149 दुकाने अशी एकूण 292 दारू विक्री दुकाने आहेत. एरवी तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना बोलावे लागत आहे. मात्र आज उलटे चित्र पहावयास मिळाले. दारु घेताना पोलिसांना पाहून धूम ठोकणारे तळीराम आज मात्र छाती काढून पोलिसांसमोरून हातात दारूच्या बाटल्या घेऊन जातानाचे चित्र जिल्हाभर पहावयास मिळाले.

परिस्थितीवर नजर
कोरोना लॉक डाऊन बाबदच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. सार्वजनिक शांततेचा भंग होणार नाही, दुसर्‍याला आपला त्रास होणार नाही याची काळजी ग्राहकांनीही घ्यावी. अजून तरी पोलीस बंदोबस्ताची मागणी कोणत्याच दुकानदाराने केलेली नाही. तरीही आम्ही नजर ठेवून आहोत. देशी दारू दुकान सुरू असलेल्या गावामध्ये अचानक भेटी दिल्या जातील. कायदा मोडणार्‍यांचा बंदोबस्त करू.
– रणजित डेरे, पोलीस निरीक्षक, नेवासा

सर्व देशी दुकाने शांततेत सुरु
नेवासा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले 8 ही देशीदारू दुकाने मंगळवारी दुपारपासून शांततेत व कोव्हीड 19 बाबद जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करू सुरू करण्यात आली आहेत. आमचे अधिकारी-कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नियमांचा भंग करणारे दुकानदार व ग्राहकांवर कारवाई केली जाईल.
– यू. पी. बर्डे, निरीक्षक उत्पादन शुल्क विभाग, नेवासा

- Advertisment -

ताज्या बातम्या