राष्ट्रीयीकृत बँकांनी वेळेवर पीक कर्ज द्यावे
Featured

राष्ट्रीयीकृत बँकांनी वेळेवर पीक कर्ज द्यावे

Sarvmat Digital

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 18 टक्के इतकेच पीककर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपाचा वेग वाढवणे आवश्यक असून विशेषतः राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकर्यांना वेळेवर कर्ज मिळेल, यासाठी गतीने कार्यवाही करावी, असे सुचनावजा आदेश राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात थोरात यांनी खरीप पीक कर्ज वाटप तसेच निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर, कृषी उपसंचालक विलास नलगे यांची उपस्थिती होती.

मंत्री थोरात म्हणाले, सध्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तसेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकर्यांना वेळेवर कर्ज मिळाले तरच त्यांना त्याचा लाभ होतो. राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांनी ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे आणि अधिकाधिक कर्जवाटप होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

बी- बियाणे, खते, कीटकनाशके यांची टंचाई जाणवू नये, यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. केवळ घरगुती नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे विक्रीसाठी येत आहेत, त्यांची उगवणक्षमता तपासावी. जेणेकरुन शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या.

युरिया खताचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत राहील, त्याचा साठेबाजार होणार नाही, याची काळजी कृषी विभागाने घेतली पाहिजे. त्याचबरोबर, करोनाचे संकट असताना दुकानासमोर शेतकर्‍यांच्या रांगा लागणार नाहीत, याचीही काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी केली. केवळ एकाच कंपनीच्या खते अथवा बियाणांचा आग्रह न धरता ती वापरावीत, यादृष्टीने कृषी विभागाने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, असेही ते म्हणाले.

चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा
निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यात अनेक कच्च्या व पक्क्या घरांचे नुकसान झाले. अकोले तालुक्यात एक युवकही दगावला. या परिस्थितीची माहिती श्री. थोरात यांनी घेतली. प्राथमिक अहवाल जरी जिल्हा प्रशासनाने तयार केला असला तरी सविस्तर पंचनामे करुन नुकसानीची माहिती संकलित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेवढी मदत करणे शक्य आहे, ती तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com