किलबिल : कृत्रिम घरट्यात वाढ, चिमण्यांची संख्या स्थिर; नाशिक ‘परमा कल्चर’कडे..
Featured

किलबिल : कृत्रिम घरट्यात वाढ, चिमण्यांची संख्या स्थिर; नाशिक ‘परमा कल्चर’कडे..

Gaurav Pardeshi

नाशिक । निल कुलकर्णी

पर्यावरण साखळीतील पहिला आणि महत्त्वपूर्ण पक्षी असलेल्या चिमण्यांची संख्या गेल्या तीन-चार वर्षात विलक्षण रोडावली होती. मात्र पक्षी आणि पर्यावरणप्रेमींनी केलेली जागृती, नागरिकांमध्ये पक्ष्यांप्रति वाढलेल्या संवेदना आणि स्वस्तात मस्त घरटे तयार करणार्‍या पक्षीप्रेमी कार्यकर्त्यामुळे शहरातील चिमण्यांची संख्या स्थिर असल्याचे दिलासादायक चित्र आहे. विशेष म्हणजे चिमण्याच्या संगोपनाचे ‘परमा कल्चर’ शहरात तयार होत असल्याचे आश्वासक आहे, असे मत पक्षीप्रमींनी नोंदवले.

सेंद्रिय शेतीमध्ये ‘परमा कल्चर’ ही संकल्पना असते. त्यामध्ये पर्यावरणपूरक शेतीसाठी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करणेही अंतर्भूत असते. नाशिकमध्ये गेल्या 7 – 8वर्षांपासून चिमण्यांची घटती संख्या लक्षात घेता चिमणी वाचवण्याचे प्रयत्न अधिक जोमाने झाले. परिणामी अनेकांनी चिमण्यासाठी कृत्रिम घरटी, फिडर विकत घेऊन बाल्कनी, बंगले आणि अपार्टमेंटमध्ये लावली. यामुळे मध्यंतरी या चिमण्या जीवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता,तो टळला असून नागरिकांनी तयार केलेले ‘परमा कल्चर’ म्हणून नाशिक नवी ओळख धारण करत आहे.

चिमणी मानवी वस्तीमध्ये राहणारा एक छोटा पक्षी. त्याचे सृष्टीतील स्थानही महत्वपूर्ण आहे. पक्ष्यांच्या ‘एबीसीडी’ याच चिमण्या पक्ष्यांपासून सुरू होते. मात्र नाशिकमध्ये गेल्या वर्षी वातावरणबदलामुळे चिमण्या शहरापासून स्थलांतरीत झाल्याचे पक्षी अभ्यासकांचे निरीक्षण नोंदवले होते. मात्र यंदा भरपूर पाऊस,चिमण्यांसाठी दाणा-पाण्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम घरटी(स्पॅरो होम) लावण्यानेे चिमण्याची संख्या स्थिर असून वाढत आहे, असे निरीक्षण पक्षी अभ्यासक डॉ. चेतन एस. जावळे यांनी नोंदवले.

जागृतीचे सकारात्मक परिणाम

यंदा पाऊस समाधानकारक झाला. चिमणी जोडीदाराचा शोध घेऊन वळचणीच्या ठिकाणी काड्या-कुड्यांनीं घरटे करते. त्यानंतर 45 ते 60 दिवसात अंडी देऊन ते उबवण्याचे काम केले जाते. पावसाळ्यात पिल्ले बाहेर येतात. कारण त्यावेळी अळी-कीटक हे पिल्लांचे खाद्य अधिक असते. गेल्या काही वर्षात पक्षी-पर्यावरणप्रेमींनी कृत्रिम घरट्यांबद्दल केलेली जागृती, ती तयार करण्याचे कार्यशाळा घेतल्याने संख्या स्थिर आहे. करोनामुळे आम्ही कृत्रिम घरटी तयार करण्याच्या कार्यशाळा रद्द केली तरी स्थिती समाधानकारक आहे.

-प्रा. डॉ. चेतन एस.जावळे, चिमणी अभ्यासक

अनुकरणीय, आश्वासक

मुंबई महामार्गावरील वस्त्यांसह पेठ, दिंडोरी, मखमलाबाद रोडसह सर्वच विस्तारित वसाहतीमध्ये चिमण्यांची संख्या चांगली आहे. तिथे नवीन प्रकल्प साकारले, सुजाण नागरिकांनी मुलांसाठी कृत्रिम घरटी लावली. पर्यायाने चिमणीसह सवर्र्च पक्ष्यांकडे मुलांचीही आस्था वाढली. नायलॉन मांज्या विरोध करण्यासह कृत्रिम घरटी, दाण्यापाण्याची व्यवस्था असणारे फिडर, कापूस- काडीकुड्यांसाठी कृत्रिम जाळी वगैरे लावण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. नाशिक पक्ष्यांची घरटे निर्मिती करणारे आणि ती घरटी लावणारे शहर म्हणून उदयास आले, हे आश्वासक चित्र आहे.

Deshdoot
www.deshdoot.com