वावीत चोरट्यांचा उच्छाद; घरांना बाहेरून कड्या लावत दोन ठिकाणी घरफोडी

jalgaon-digital
2 Min Read

सिन्नर | वार्ताहर

तालुक्यातील वावी येथे आज दि.27 मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने उच्छाद केला. घरांना बाहेरून कड्या लावत दोन ते तीन ठिकाणी चोरी करण्यात आली असून एका ठिकाणी दरवाजा तोडण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.

राजवाडा परिसरातील विनायक घेगडमल यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला, मात्र त्यापूर्वी आजूबाजूच्या चार-पाच घरांच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या. घरातील सामान अस्ताव्यस्त करत हाती काही न लागल्याने चोरटे पसार झाले. जाताना त्यांनी घेगडमल राहत असलेल्या घराचा मागील दरवाजा लोखंडी टॉमीने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज झाल्याने घरातील माणसे जागी झाली.

तेथून आपला मोर्चा अरुण राजेभोसले यांच्या घराकडे वळवत चोरट्यानी त्यांच्या घरात प्रवेश केला. राजेभोसले यांच्या पत्नी संगिता व मुलगा निलेश हे दोघे घरात झोपले होते. संगीता झोपलेल्या खोलीतील कपाट उघडत असताना आवाज झाल्याने त्यांना जाग आली. समोर चार चोरटे पाहून त्या मोठ्याने ओरडल्या. त्यामुळे चोरटे बाहेर पळाले, आईचा आवाज ऐकून बाजूच्या खोलीत झोपलेला निलेश बाहेर धावला. शेजारी राहणारे देखिल आवाज ऐकून बाहेर आले. त्यावेळी घरापासून थोड्या अंतरावर चेहरा झाकलेले चार धिप्पाड तरुण उभे होते. त्यांच्याकडे निलेश, संदीप व सागर राजेभोसले यांनी दगड भिरकावले. त्यामुळे काही अंतर पुढे जात चोरट्यानी देखील उलट दगडफेक करत दुशिंगवाडी रस्त्याकडे पोबारा केला.

दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात कळवल्यावर पोलिसांनी वाहनासह धाव घेतली. परिसरात आठ दहा किमी पर्यंत शोध घेऊनही चोरट्यांचा माग लागला नाही. वावी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या लहानमोठ्या घटना घडत आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामावरील साहित्य लांबवल्याचे प्रकार घडले असून, यात स्थानिक तरुणांचा हात असावा असा संशय आहे. पोलीस देखील त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

40 हजारांचा मोबाईल लांबवला

राजेभोसले यांच्या घरातून चोरत्यानी निलेश याचा 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन व महत्वाचे कागदपत्रअसणारी बॅग लंपास केली. याच बॅगमध्ये मोबाईलचे बिल देखील असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *