Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : देशदूत संवाद कट्टा : करोनाबाबत भीती नको; मात्र जागरुकता गरजेची

Video : देशदूत संवाद कट्टा : करोनाबाबत भीती नको; मात्र जागरुकता गरजेची

नाशिक । प्रतिनिधी

परदेशातून येणार्‍या नागरिकांवर शासनाद्वारे विशेष लक्ष दिले जात असून शहरात विविध भागात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. यातून एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी करोना आजाराबद्दल घाबरून न जाता केवळ काळजी घेणे महत्त्वाचे आहे. करोना झालेल्या रुग्णाला एकाकी करून उपचार केले जातात. त्यामुळे इतरांनी त्याला घाबरण्याचे कारण नसल्याचा सूर ‘देशदूत’ संवाद कट्ट्यातून उमटला.

- Advertisement -

‘देशदूत’तर्फे करोना आजाराबद्दल जनसामान्यांत असलेल्या संकल्पनांतून प्रबोधन करण्यासाठी ‘संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी’ यावर संवाद कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपाच्या आरोग्य विभागातील करोना या स्वतंत्र विभागाचे प्रमुख डॉ. शेटे, संदर्भ रुग्णालयातील पॅथॉलॉजिस्ट डॉ. सतीश शिंपी, स्त्रिरोग तज्ज्ञ डॉ मनिषा शिंदे, डॉ. संजय दाभाडकर, वैद्य विभव येवलेकर, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सहभाग घेतला होता.

सध्या हवामानातही वेगळे बदल होत आहेत. सकाळी रात्री गारवा तर दुपारी उन अशा वातावरणामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. यात सर्दी व खोकल्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मात्र सर्दी, खोकला म्हणजे करोना नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम होत आहे. वेळी अवेळी वैद्यकिय सल्ल्याशिवाय घेतलेली औषधेही प्रकृतीला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे करोनाबद्दल भिती बाळगू नये मात्र आपल्या प्रकृतीला सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन या चर्चेतून करण्यात आले. प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. आपल्या मानसिकतेतूनच मोठे आजार बरे होण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार दिनचर्या, ऋतूचर्या,आहार- विहार यातूनच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न होत असतात.

शासनस्तरावरुन करोनाला सामोरे जाण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. हा परदेशी आजार असल्याने परदेशातून येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवली जात आहे.हा देशांतर्गत पसरु नये यासाठी काळजी घेतली जाते. याचा अर्थ शहरात राज्यात करोना पसरलेला आहे,असे होत नसल्याचा निर्वाळा अधिकार्‍यांनी दिला. फिल्ड वर्कर्स परदेशातून आलेल्यांची सविस्तर माहिती घेत आहेत.

त्यांच्या तपासण्या केल्या जातात. चाचण्या घेतात. त्यामुळे सर्वसामान्यांना करोनाबाबत भिती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात करोना नाही. त्याची भिती बाळगण्याचे कारण नाही. शिंका खोकला आल्यास तोंडावर रुमाल ठेवणे गरजेचे आहे. ऋतूला साजेशे अन्न, योग्य त्या काळात खाणे गरजेचे आहे. आपल्या शरिरातील सकारात्मक उर्जा वाढवून प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. पहाटे चालण्यातून उर्जा चांगली मिळते. मन शांत ठेवावे, सकारात्मक विचार मनात वाढवावेत या माध्यमातून शरीर सुदृढ करण्यावर भर दिल्यास उपयोग होतो असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

शासनाच्या माध्यमातून मनपा व जिल्हा स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहर परिसरातील काही हॉस्पिटल्समध्ये खोल्याही राखून ठेवण्यात आल्या आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 21 जणांची तपासणी केली. सर्व सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आपल्या परिसरात परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीची माहिती मनपाला कळवावी. मनपाची टीम त्यांच्याकडे जाऊन त्यांची तातडीने तपासणी करेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या