Saturday, April 27, 2024
Homeनगरसरकार पाच वर्ष यशस्वी वाटचाल करेन

सरकार पाच वर्ष यशस्वी वाटचाल करेन

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास; कुटुंबासह साईसमाधीचे दर्शन

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- ब्रह्मा-विष्णू-महेश यासारखे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असून हे सरकार पाच वर्ष आरामात यशस्वी वाटचाल करेन असा विश्वास राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डीत व्यक्त केला.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवार 12 रोजी सकाळी मध्यान्ह आरतीपुर्वी शिर्डीत साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते त्यांचा शाल मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ एकनाथ गोंदकर, माजी विश्वस्त अशोक खांबेकर, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, सामाजिक कार्यकर्ते संजय त्रिभुवन, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, मंदिर सुरक्षेचे मधुकर गंगावणे, सहा पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद पाटील, कोपरगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके, युवक काँग्रेसचे तुषार पोटे, निरंजन फुंदेकर, लक्ष्मण फुंडकर, अहमद पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

साई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य हे प्रगतीकडे जावो, मागील सरकारच्या तसेच राज्याच्या जनतेच्या अपेक्षा नवीन सरकारने पूर्ण कराव्यात, आणि महाराष्ट्र राज्य हे देशातीलच नव्हे तर जगातले सर्वात मोठे लोकशाहीला मजबूत करणारे राज्य व्हावे. राज्यात सुख आणि शांती राहावी अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील पक्षाचे सरकार स्थापन झाले असले तरी मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत नाराजी होताना दिसून येत आहे या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की ब्रह्मा-विष्णू-महेश या विचारांचे सरकार आहे.

त्यामुळे या सरकारमध्ये काही बदल होईल असे मला वाटत नाही या सरकारकडे 170 आमदारांचे बहुमत आहे त्यामुळे पुढील पाच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार आरामात टिकेल असे सांगत अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे की विरोधीपक्ष व सत्ताधारी या दोघांना मिळून राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय विधानसभेत व्हावे असे माझे मत आहे.

राज्याच्या विभाजनावर बोलताना त्यांनी सांगितले की ही मागणी जनतेची असून याला राज्य सरकारपेक्षा केंद्रसरकारची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून पुढे जाऊ शकतो अशी अनेक लोकांची भूमिका आहे.

अशा मागण्या आपापल्या विचारांच्या असतात.त्यामुळे राज्यकर्त्यांनी हा निर्णय घ्यावा की नाही हा त्यांचा विषय आहे. जगात असे कुठेच संविधान नाही, की जो आपल्या भारताच्या संविधानाबरोबर बरोबरी करू शकतो. आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केले आहे.

संविधानाच्या आधारावर लोकतंत्र चालत आहे. शेगाव येथील विकासावर त्यांनी सांगितले की यामध्ये राजकीय लोकांचे मोठे योगदान असून त्याठिकाणी प्रशासकीय व्यवस्था नाही. महाराष्ट्रातील देवस्थानच्या ठिकाणी जे जे राजकीय मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठा विकास झाला असल्याचे त्यांनी सांगितले. कोपरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या लोकांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार नाही. निष्ठावंतांना तसेच नवीन लोकांना संधी देऊ, केवळ पदासाठी पक्षात येणार्‍या लोकांना यापुढे स्थान राहाणार नाही. केवळ पदे घेऊन मिरवणा-यांनी गावोगावी जाऊन पक्षसंघटन मजबूत करावे.
-नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या