कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ‘नागवडे’ कारखाना तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० हजार रुपये देणार
Featured

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ‘नागवडे’ कारखाना तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० हजार रुपये देणार

Sarvmat Digital

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी ‘नागवडे’ कारखाना श्रीगोंदा नगरपालिकेला ५० हजार रुपये तर तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० हजार रुपयांचा तातडीचा मदतनिधी देणार असल्याची माहिती ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. गरज पडल्यास स्थानिक प्रशासनाला देखील आर्थिक सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे नागवडे यांनी यावेळी सांगितले.

याबाबत माहिती देताना नागवडे म्हणाले की, सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. कोरोनाचे संकट मोठे असून सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे. तालुक्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही ही दिलासादायक बाब आहे. तरी देखील तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे .या कठिण परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे.घाबरुन न जाता आवश्यक ती खबरदारी घेतल्यास आपण या संकटापासून स्वतःचे,कुटूंबाचे व आपल्या समाजाचे अन् देशाचेही संरक्षण करु शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने श्रीगोंदा नगरपालिकेसह प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर काम सुरू आहे. या कामांसाठी नागवडे कारखान्याने मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे.नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे व मुख्याधिका-यांच्या  मागणी प्रस्तावानुसार  श्रीगोंदा नगरपालिकेला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देणार असून  तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी १० हजार रुपयांचा तातडीचा मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com