नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात सुखधान यांनी केले असूड आंदोलन

jalgaon-digital
4 Min Read

नेवाशात आठ दिवसांपासून स्वच्छता कर्मचार्‍यांचे काम बंद; शहरात साचला कचरा

नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात असूड आंदोलन करत वाजत गाजत शहराच्या मुख्य रस्त्यावर जमा झालेला कचरा गोळा करून नगरपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात आला.

शनिवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते संजय सुखधान यांनी खाजगी स्वच्छता कर्मचारी व नागरिकांना बरोबर घेऊन स्वतःला असूडाचे फटके मारत कचरा गोळा करत नेवासा बसस्थानक परिसरापासून आंदोलन सुरू केले. गणपती मंदिर चौक, नगरपंचायत चौक तसेच मुख्य रस्त्यावर साचलेला कचरा गोळा करून नगरपंचायत कार्यालय, नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांच्या दालनासमोर टाकण्यात आला.

दरम्यान स्वच्छता ठेकेदाराकडे असलेल्या कर्मचार्‍यांनी वेतनासाठी काम बंद आंदोलन केल्याने मागील आठ दिवसांपासून शहरातील स्वच्छतेसाठी कचरा गोळा करणार्‍या घंटागाड्या बंद आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले. शहरात घरोघरी तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे.

यावेळी संजय सुखधान म्हणाले, ठेकेदाराने स्वच्छतेचे कंत्राट यापुढे चालवू शकत नसल्याबाबत नगरपंचायत प्रशासनाला पत्र दिले असले तरी सदर खासगी कर्मचार्‍यांना कंत्राटी पद्धतीने घेऊन शहर स्वच्छतेची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. प्रशासनाला मात्र याचे कसल्याच प्रकारचे गांभीर्य नसल्याने शहरात गेल्या आठ दिवसांपासून अस्वच्छता आहे. शहरात स्वच्छता व्हावी तसेच या कर्मचार्‍यांना न्याय मिळावा यासाठीच हे आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन निर्णयाप्रमाणे महिन्याला साडेआठ हजार रुपये पगार देण्याचे ठरलेले असल्याचे नगरपंचायत बरोबर झालेल्या करारात ठेकेदाराने नमूद केले होते. परंतु महिला कर्मचार्‍यांना दीडशे रुपये रोजाप्रमाणे तीन हजार सहाशे महिना व पुरुष कर्मचार्‍यांना अडीचशे रुपये रोजप्रमाणे सहा हजार रुपये पगार असे देण्यात आले. मे 2019 मध्ये कंत्राट संपल्यानंतर कर्मचार्‍यांनी उर्वरीत रकमेची मागणी केली परंतु कंत्राट काही दिवस वाढवून घेतले असल्याचे सांगत ठेकेदाराने सध्या पगार देता येणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान सर्व कर्मचार्‍यांनी 20 जानेवारीला स्वच्छतेचे काम बंद करत उर्वरिीत पगार मागितला असता ठेकेदाराकडून गलिच्छ भाषा वापरण्यात आली. तेव्हा ठेकेदारावर येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास 3 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचे स्वच्छता कर्मचार्‍यांनी पोलीस उपनिरीक्षक भारत दाते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

यावेळी खासगी स्वच्छता कर्मचारी विजय शिनगारे, विकास वाघमारे, विजय कांबळे, शाम अवसरमल, विजय आढागळे, आदेश चक्रनारायण, राजू भारस्कर, विशाल चव्हाण, बाळू पंडित, विकास साळवे, सनी चक्रनारायण, शाहरुख पठाण, भीमा इंगळे, भाऊसाहेब चव्हाण, निशांत चव्हाण, रुक्मिणी चव्हाण, लक्ष्मीबाई चव्हाण, आशाबाई वाघमारे, अनिता वडागळे, मंदा चव्हाण, स्वाती चव्हाण, कमल सरोदे, पूजा चक्रनारायण, रिबिका चव्हाण, अलका धुमाळ, मीना चव्हाण यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

शहर फक्त ‘अ‍ॅप’वरच स्वच्छ !
मागील आठवड्यापासून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असताना नगरपंचायत कर्मचारी मात्र शहरात फिरून नागरिकांकडून माहिती घेत ती माहिती मोबाईल अ‍ॅपवर अपलोड करण्याचे काम करत आहेत. स्वच्छता फक्त मोबाईलवर होत असल्याची चर्चा आंदोलनादरम्यान सुरू होती.

घनकचरा व्यवस्थापनाचे नवीन कंत्राट पुढील आठ ते दहा दिवसांत सुरू होईल. तोपर्यंत नगरपंचायत यंत्रणेमार्फत शहर स्वच्छतेचे काम सुरू राहणार आहे.
– योगिता पिंपळे, नगराध्यक्षा

कचरा संकलनाची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नगरपंचायत प्रशासनाने उपलब्ध कर्मचारी व वाहनाद्वारे शहर स्वच्छता ठेवावी.
– फेरोजबी पठाण, नगरसेविका

नगरपंचायतीमधील बहुतांश अधिकारी हे परगावी राहत असल्याने आंदोलनादरम्यान कुणीही अधिकारी उपस्थित नव्हता. तर आंदोलनानंतर मुख्याधिकांर्‍यासह स्वच्छता विभागाचे अधिकारी यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *