नगरची धनिकांची सथ्था कॉलनी चोहोबाजुने सील

नगरची धनिकांची सथ्था कॉलनी चोहोबाजुने सील

12 जूनपर्यंत सर्व बंद : अत्यावश्यक सुविधेसह अन्य सेवा प्रशासन पुरविणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सुशिक्षित आणि बहुतांशी व्यापारी वर्गाची वसाहत असणार्‍या स्टेशन रोडवरील सथ्था कॉलेनीत एकाच कुुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने नगर शहरात खळबळ उडाली आहे. पुण्यात गेलेल्या एका कुटूंबांने कॉलनीत करोना आणल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे प्रशासनाने सथ्था कॉलनीत कंटेनमेंट झोन घोषित करत तेथील रस्ते बंद केले. आता 14 दिवस या भागातील हायक्लास फॅमिली घरातच कोंडली जाणार आहेत. या ठिकाणी दूध अन् इतर आवश्यक गोष्टी महापालिकेमार्फत पुरविण्यात येणार आहे.

शहरातील सथ्था कॉलनी ही बड्या लोकांची कॉलनी म्हणून ओळखली जाते. कॉलनीतील 60 वर्षीय वृद्ध महिलेस उपचारासाठी पुण्यात नेण्यात आले. तेथेच त्यांना करोनाची बाधा झाली. ही महिला कुटूंबातील इतरांच्या संपर्कात आल्याने त्यांनाही करोना झाला. दोन मुले, सुनांसह पाच जणांचा करोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. पुण्यात उपचारासाठी गेलेल्या महिलेचा अहवाल शुक्रवारीच पॉझिटिव्ह आला होता.

त्यामुळे प्रशासनाने कुटुंबातील 14 जणांना ताब्यात घेत क्वारंटाइन केले. त्यातील पाच जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. आता या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे.

करोनाचा शिरकाव कसा ?
सथ्था कॉलनी शिस्तीची आणि नियम पाळणारी म्हणून ओळखली जाते. मात्र या कॉलनीत करोनाने कसा प्रवेश केला, याबाबत सर्वच संभ्रमित आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कुटुंबातील एकही सदस्य घराबाहेर पडलेला नसल्याचे या कुटुंबातील सदस्यांनी सांगितल्याने प्रशासनाने डोक्याला हात लावला आहे. कोणताच संपर्क नसतानाही करोनाची लागण झाल्यामुळे कदाचित भाजी, फळ या द्वारे हा विषाणू बाधितांच्या घरात आला असावा किंवा भाजी खरेदीसाठी कोणी घराबाहेर पडले असल्यास गर्दीत गेल्याने ही लागण झाल्याचा अंदाज आता व्यक्त होत आहे.

बफर झोन
बाजार समितीचे भूुसार मार्केट आवार ते स्टेशन रोड, तुळजाभवानी मंदिर, पांजरपोळ संस्थेचे गाळे, वायएमसी संस्थेचे ग्राऊंड, कोठीची पूर्व बाजू, अरिहंत सोसायटी, पूनममोतीनगर. (फक्त अत्यावश्यक सेवा सुरू).

हा भाग बंद
स्टेशन रोड, सिद्धेश मोटार्स, जुने कैलास हॉटेल, डॉ. खालकर हॉस्पिटल, कोठी रोड, हेमराज केटर्स, मारूती मंदिर, पुंड यांचे घर, मार्केट कमिटीची पूर्वेकडील भिंत ते स्टेशन रोड (अत्यावश्यक सेवेसह सर्व बंद).

सथ्था कॉलनी कंटेनमेंट झोन करण्यात आल्याने कॉलनीत जाणारे रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. आता प्रशासनाच्या परवानगीशिवाय कॉलनीत कोणाला जाता येणार नाही आणि आतील लोकांना बाहेर येता येणार नाही. 12 जूनपर्यंत या कॉलनीचे सर्व रस्ते बंद राहणार आहेत. स्टेशन रस्त्यावरील एकच रस्ता एन्ट्रीसाठी ठेवण्यात आला असून बाकी रस्ते बंद केले आहेत. कॉलनीच्या आवतीभवतीचा परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com