Friday, April 26, 2024
Homeनगर‘अवकाळी’चा नगरला तडाखा, वादळामुळे अस्तगावात प्रचंड नुकसान

‘अवकाळी’चा नगरला तडाखा, वादळामुळे अस्तगावात प्रचंड नुकसान

दीड तास मुसळधार, नागरिकांची तारांबळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहर व सावेडी उपनगराच्या परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे आणि विजाच्या लखलखाटात अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे लॉकडाऊनच्या काळात कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. जवळपास दीड तास पाऊस सुरू होता. यामुळे शहराच्या सखल भागात पाणीच पाणी झाले.

- Advertisement -

नगर शहर आणि परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. दोन दिवसांपासून उकाडा जाणवत होता. त्यातच शुक्रवारी दुपारी अडीच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस सुरू झाला. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी आहे. मात्र, किराणा, औषधे, भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्‍या नागरिकांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे धावपळ उडाली.

रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांचे हाल झाले. जवळपास दीड तास सुरू असणार्‍या या पावसामुळे शहरातील माळीवाडा, पटवर्धन चौक, मार्केट यार्ड, सर्जेपुरा, सावेडीतील कुष्ठधाम रोड, पाइपलाइन रोड, यासह तालुक्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती. या पावसामुळे शहरात काही पत्र्याचे शेड पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

स्वास्तिक चौकातील एका हॉटेलची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळं नुकसान झाले. मार्केटयार्ड परिसरात सुद्धा एक पत्र्याचे शेड पडले आहे. यासह काही ठिकाणी झोड पडल्याची माहिती आहे. नगर शहरात एका ठिकाणी विज कोसळ्याचे सांगण्यात आले. मात्र, यात किरकोळ हानी झाल्याचे चर्चा होती.

घरांची पत्रे उडाली, विजेचे खांब पडले, कांदेही भिजले

अस्तगाव (वार्ताहर)- वादळ आणि अवकाळी पावसाने अस्तगाव भागातील अनेक घरांचे पत्रे उडाली, शेतात साठविलेला कांदा भिजला. काही ठिकाणी झाडांच्या फाद्या पडल्या, विजेचे खांबही पडले, यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.या वादळी पावसामुळे वीज परिवठा खंडित झाला होता.

काल दुपारी 4 नंतर पावसाळी वातावरण दिसून आले त्यानंतर पावणेसहाच्या दरम्यान वादळी वार्‍यांसह पावसाचे जोरदार आगमन झाले. उत्तर दिशेकडून पाऊस पडत असल्याने पू र्व पश्चिम केलेल्या कांदा चाळींमध्ये पाणी शिरले. काही शेतकर्‍यांनी शेतातच कांदा झाकून ठेवला होता. वार्‍याने त्यावरील झाकलेले उडाल्याने कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले.

वादळीवार्‍यात प्रचंड जोर असल्यान परिससरातील अनेक घरांचे छत उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. त्यात काहींचे धान्यही भिजले आहे. गावठाणातील एकनाथ बाणेदार यांचे राहात्या घराचे पत्रे उडाले आहेत. चाळीस वाडीतील सुंदर सोनवणे यांच्या घराचे छत, परसराम आष्टेकर यांच्या घराचे पत्रे, गणेश गोदावरी कालव्याच्या लगत पुर्व बाजुला असलेल्या गणेश जेजुरकर यांच्या घराचे छत, सुधिर त्रिभुवन यांचे घराचे छत, काशिनाथ संतराम त्रिभान यांच्या संपूर्ण घराचे पत्रे उडून गेले आहेत.

माणिक बाबुराव त्रिभुवन यांच्याही घराचे पत्रे उडाले आहेत. याशिवाय बाजार तळाजवळील मोठ्या लिंबाची फांदी तुटून ते चंद्रकांत वसंतराव गाडेकर यांच्या दुकानच्या शेडवर पडली आहे. कालव्याच्या पूर्व भागातील मल्हारी जेजुरकर यांच्या वस्तीनजीक विज वितरण कंपनीचे चार पाच विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यावरील विजेच्या तारा निखळून पडल्या आहेत. त्यामुळे विजपुरवठा खंडीत झाला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर यांच्याही पाच सहा ट्रॉलीभर कांद्याचे नुकसान झाले आहे. पिंप्रीनिर्मळ रोडवरील जेजुरकर वस्तीवरील मधुकर नानासाहेब जेजुरकर यांच्या वस्तीवरील मोठे लिंबाचे झाड उन्मळुन पडले. सुदैवाने कोणताही हानी झाली नाही. घरानजीक हे झाड होते.

कुटूंब उघड्यावर
त्रिभान वस्तीवरील काशिनाथ संतराम त्रिभान यांचे घराच्या दोन खोल्यांवरील पत्रे पुर्णपणे उडून गेले. वादळात इतका जोर होता की, हे पत्रे 800 ते 900 फुट अंतरावर उडून गेले. या दोन्ही खोल्यांच्या भिंतीही पडल्या, त्यामुळे पावसाचे पाणी खोल्यांमध्ये शिरले, त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. संपुर्ण भांडी, किचन मधील सहित्य भिजुन गेले, 6 पोते धान्य त्यांचे भिजले आहे. त्यांचा संपुर्ण संसारच उघड्यावर आला आहे. पत्रे उडून गेल्यावर त्या ठिकाणी बोरीचे झाडही उन्मळून त्यांच्या घरावर पडले. सुदैवाने यात कुणीही जख्मी झाले नाही. त्यांच्या शेजारी हौशीराम त्रिभान यांचे जुने आंब्याचे झाड उन्मळून पडले आहे.

पॉलिहाऊस कोसळले !
अस्तगाव येथील अनिल रामनाथ त्रिभान यांचे रोपवाटिकेचे पॉलिहाऊस स्ट्रक्चरसह एका बाजुने खाली आले आहे. त्यांच्या पॉलिहाउसचे 25 टक्के नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. सुरुवातीला पावसाचे आगमन झाले. त्यानंतर प्रचंड वादळाचे आगमन झाले. प्रचंड जोर असलेल्या या वादळी वार्‍याने पक्के असलेले पॉलिहाउसचे स्ट्रक्चर उडाले. असे सुनिल त्रिभान यांनी सांगितले. डाळींब बागांनाही फटका बसला आहे. द्राक्षांची काढणी सुरु आहे. जास्त दिवस द्राक्षे बागेवर राहिले तर क्रॅकींगचा धोका शेतकर्‍यांना सतावेल असे पिंपळस येथील द्राक्ष उत्पादक विनोद निरगुडे व विजय निरगुडे यांनी ंसागितले. माणिक बाबूराव त्रिभूवन यांच्या घरावर झाड पडले तर अनिश आरिफ शेख यांच्या घरावरील पत्रे उडाली. अस्तगाव भागातील शेतकर्‍यांच पिंकांचे तसेच घरांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर व माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे यांनी सार्वमतशी बोलतांना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या