नगरच्या पालकमंत्रिपदासाठी चुरस
Featured

नगरच्या पालकमंत्रिपदासाठी चुरस

Sarvmat Digital

थोरात समर्थक आग्रही : वळसे पाटील इच्छुक : गडाखांसाठीही चाचपणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर नुकतान मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता मंत्र्यांना विभाग वाटप आणि पालकमंत्रिपदांकडे लक्ष आहे. नगरच्या पालकमंत्रिपदावरून चांगलीच चुरस असल्याचे समोर येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना यापैकी कोणाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जाईल, याविषयी उत्सुकता वाढली आहे.

आघाडी सरकारच्या काळात परंपरेने राष्ट्रवादीकडे नगरचे पालकमंत्रिपद होते. मात्र बदलत्या सत्ता समिकरणात यात यावेळी बदल होईल का, याकडे लक्ष आहे. राज्याचे मातब्बर नेते ना.बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी यावेळी पालकमंत्रिपद काँग्रेसकडे यावे, यासाठी आग्रह धरला आहे. मात्र खुद्द ना.थोरात यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे समजते.

राजकारणात काही पथ्य पाळावीत असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद टाळण्याकडे त्यांचा कल असल्याचे म्हटले जाते. मात्र जिल्ह्यातील बदलत्या समिकरणात पालकमंत्रीपद आवश्यक आहे, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. विरोधकांनी डोके वर काढू नये यासाठी पालकमंत्रीपदाचा उपयोग होईल असे काहींना वाटते. राष्ट्रवादीशी ना.थोरात यांचे चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे पवार आणि थोरात यांचे राजकीय विरोधकही एकच आहेत. त्यामुळे त्यांनी नगरचे पालकमंत्रीपद स्वत:कडे घ्यावे, असा आग्रह समर्थक धरणार आहेत.

नगर जिल्ह्यात राजकीय ताकद मोठी असल्याने राष्ट्रवादी पालकमंत्रीपद सोडणार नाही, असा विश्वास पक्षातील नेत्यांना वाटतो. जिल्ह्यात पक्षाचे निम्मे आमदार आहेत. त्यामुळे हे पद पक्षाकडेच असावे, यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील असतील. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा ना.दिलीप वळसे पाटील इच्छुक असल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही ते जिल्ह्याचे पालकमंत्री राहीलेेले आहेत. त्यांची ती कारकिर्दीची आठवण आजही राजकीय गप्पांमध्ये काढली जाते. नगर जिल्ह्याबद्दल ना.वळसे यांनाही आत्मियता आहे. त्यामुळे ते आग्रह धरून पक्षाकडून पालकमंत्रीपदाची जबाबदारी आपल्याकडे घेतील, असा अंदाज वर्तविला जातो.

सेनेने ना.शंकरराव गडाख यांना मंत्रिमंडात थेट कॅबिनेट मंत्रीपदी संधी दिल्याने जिल्ह्यातील काहींना जबर धक्का बसला आहे. या धक्क्यातून अनेकजण अद्याप सावरलेले नाहीत. नगर जिल्ह्यात सेनेचे बळ विधानसभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर खालावले. संघटना उभी करण्यासाठी ना.गडाख यांच्या माध्यमातून रणनिती आखण्याची तयारी सेनेने सुरू केल्याचे दिसते. त्यासाठी नगरचे पालकमंत्रीपद अतिरिक्त बळ ठरणार आहे.

त्यामुळे यावेळी सेनेने नगरचे पालकमंत्रीपद आपल्याकडे घ्यावे, असा आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. ना.गडाख यांच्या निमित्ताने जिल्ह्यातील कोणाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

वळसे-गडाख सामना
ना.शंकरराव गडाख आधी राष्ट्रवादीतच होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी गेली 5 दशके ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ दिली. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीचे राजकारण आणि त्यानंतर पक्षातून मिळणार्‍या वागणुकीला कंटाळून गडाखांनी राष्ट्रवादीचा त्याग केला. त्यानंतरही त्यांचे पवार कुटुंबाशी स्नेहाचे संबंध कायम आहेत. मात्र राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीला काही प्रमाणात ना.दिलीप वळसे पाटीलही जबाबदार होते, अशी चर्चा गडाख समर्थकांत होत असते. अलिकडच्या राजकारणात स्थानिक पातळीवरील कटूता मागे टाकत गडाखांनी पुढे पाऊल टाकले आहे. मात्र वळसे पाटलांशी राजकीय संबंधात सुधारणा झाली की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्याचा काही परिणाम पालकमंत्री पदासाठी होणार्‍या चुरशीवर होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.

Deshdoot
www.deshdoot.com