नगरमध्ये पोलिसांची कठोर भूमिका; मोठ्याप्रमाणात वाहने जप्त

नगरमध्ये पोलिसांची कठोर भूमिका; मोठ्याप्रमाणात वाहने जप्त

रस्त्यावर दिसल्यास कारवाईचा धडाका : सहकुटुंब बाहेर पडणारेही सुटले नाहीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरासह जिल्ह्यात कलम 144 नुसार जमावबंदी व संचारबंदी लागू असतानाही नगरकर सातत्याने बाहेर पडत असल्याने पोलिसांनी रविवारी कठोर भूमिका घेत दुचाकी, चारचाकी, रीक्षा अशा सुमारे 400 पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करत ते जप्त केले आहेत. वाहन मालकांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. शहर पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कोरोना जिल्ह्यात हळूहळू पाय पसरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे 21 रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून जिल्ह्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. भादंवि कलम 144 अन्वये संचारबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये येणारे मेडिकल, दवाखाने, किराणा दुकान, भाजी खरेदी केंद्र आदी सेवा दिवसभर सुरू ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही लोक वारंवार घराबाहेर पडताना प्रशासनाच्या लक्षात आले.

सुरवातीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रस्त्यावर उतरून लोकांना घरात थांबण्याचे आहवान केले. विनाकारण फिरणार्‍यांवर गुन्हेही दाखल केले. परंतु, त्यात फरक पडत नसल्याने प्रशासन आणखी कठोर झाले. भाजी, किराणा माल, दूध, मेडिकल शहरातील लोकांना घराजवळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. संचारबंदी नियमानुसार भाजी, किराणा, मेडिकल खरेदीसाठी कोणत्याही खासगी वाहन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून लोक दुचाकी, चारचाकीला बोगस स्टीकर लावून रस्त्यावर फिरताना आढळून आले.

यामुळे शुक्रवारी बोगस स्टीकर यूजरवर कारवाई करण्यात आली. तर, रविवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, भिंगारचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी यांच्या पथकाने रविवारी सकाळपासून दुचाकी, चारचाकी, रिक्षा आदी वाहनांवर कारवाई करत ती जप्त केली. ही कारवाई डीएसपी चौक, सावेडी परिसरातील भिस्तबाग, प्रोफेसर कॉलनी चौक, एकविरा चौक, नेप्ती नाका, चितळेरोड, बालिकाश्रम रोड, दिल्लीगेट, मार्केटयार्ड परिसर, केडगाव परिसर, भिंगार परिसरात करण्यात आली.

सकाळपासून दुचाकी, चारचाकी घेऊन बाहेर पडणार्‍या नागरिकांना पोलिसांकडून अडविले जात होते. त्यांच्याकडे चौकशी केली तर क्षुल्लक कामासाठी कुटुंबातील एकापेक्षा जास्त व वाहन घेऊन बाहेर पडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अशा लोकांचे वाहन जप्त करत ते संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. ही कारवाई दिवसभर सुरू होती.

संबंधित वाहन चालक, मालकाविरोधात पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिवसभरात कोतवाली, भिंगार, तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे चारशे पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

विनाकारण नागरिकांनी बाहेर पडू नये, पडल्यास वाहने जप्त करण्यात येतील. रविवारी जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकांविरोध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशाने जप्त वाहने सोडली जातील. वाहन जप्तीची मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच थांबावे.
– संदीप मिटके, शहर पोलीस उपअधीक्षक, नगर.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com