नगर : कापडबाजारात शटर ओपन…

दोन महिन्याच्या गॅपनंतर दुकानं सुरू । मुदतीआधीच चितळे रोड सुरू अन् बंदही

अहमदनगर (प्रतिनिधी) – दोन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर नगर शहरातील कापडबाजार आज जोमात सुरू झाला. सोबतच नवी पेठेतील दुकानांचे शटरही ओपन झाले. दरम्यान प्रशासनाच्या आदेशाकडे कानाडोळा करत तेलीखुंट ते चौपाटी कारंजा रोडची दुकाने उघडली अन् भाजीबाजारही भरला. पोलीस व महापालिका प्रशासनाने तातडीने गर्दी हटवित उघडलेली दुकाने बंद केली.

दोन महिन्यांपासून नगर शहरातील कापड बाजाराची मुख्य बाजारपेठे लॉकडाऊन होती. आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली व्यापार्‍यांनी काल मंगळवारी महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेेट घेत दुकाने सुरू करण्याची परवानगी मागितली. आयुक्तांनी रात्री आदेश काढत टप्प्याटप्प्याने बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी दिली.

आज बुधवारी कापडबाजार, घास गल्ली, गंज बाजार परिसरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार दुकाने सुरू झाली. दोन महिन्यानंतर उघडलेल्या दुकानात धुळीचे साम्राज्य पसरले होते. कामगारांच्या मदतीने व्यापार्‍यांनी दुकानाची साफसफाई केली. बाजारपेठ सुरू झाल्याचे समजताच खरेदीसाठी नगरकरांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. बहुतांश दुकानाच्या बाहेर सॅनिटाइझर ठेवण्यात आले होते. मास्क असल्याशिवाय ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात नव्हता.

तेलीखुंट ते चौपाटी करंजा रोडची दुकाने उद्या गुरूवारपासून उघडली जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. मात्र कापडबाजारातील दुकाने उघडली त्यामुळे याही भागातील व्यापार्‍यांनी दुकाने सुरू केली. रस्त्याकडेला भाजी विक्रेत्यांनी पथारी मांडली. त्यामुळे गर्दी झाली. अखेर पोलीस व महापालिका प्रशासनाने ही गर्दी हटवित उघडलेली दुकाने बंद केली. कापडबाजार सुरू झाला असला तरी खरेदीसाठी मात्र निरूत्साह दिसून येत होता.

पोलीस, मनपा पथक अन् बाऊन्सरही….
दुकानांत ग्राहकांनी नियमांचे पालन करावे यासाठी दुकानदारांनी दुकानाबाहेर बाऊन्सर ठेवले आहेत. गर्दी होणार नाही, हात स्वच्छ करा यासाठी हे बाऊन्सर ग्राहकांना सूचना देत होते. बाऊन्सर घाबरून ग्राहकही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत होते. त्यासोबतच पोलीस यंत्रणा व महापालिकेचे स्वतंत्र पथकही बाजारपेठेत नियमांचे पालन होते की नाही याची पाहणी करत होते.