नगर तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग
Featured

नगर तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग

Sarvmat Digital

24 हजार हेक्टरवर खरिपाची लागवड होण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यात मागील आठवड्यात रोहिणी नक्षत्रातील पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतींना वेग आला आहे. शेतकर्‍यांनी खरीप पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक त्या काकर्‍या-पाळी घालण्यास सुरुवात केली आहे.

उन्हाळ्यामध्ये शेत नांगरणी, सपाटीकरण, बांध-बंदिस्ती आदी कामे करुन घेण्यात आली. यावर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे मूग, सोयाबीन, मका, कपाशी, तूर यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात होणार आहेत. मागील दोन तीन वर्षांपासून पाऊस बळीराजाला हुलकावणी देत आला. आत्तापर्यन्त कडाक्याचे ऊन, तीन वर्ष सलग दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न, अशातच करोनासारख्या महाभयंकर रोगाला बळीराजा आत्तापर्यन्त तोंड देत आला आहे.

परंतु यावर्षी सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे यावर्षी तालुक्यात 24 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाची लागवड होण्याची शक्यता आहे. मृगाच्या नक्षत्रात आणखी एक दोन पाऊस होताच मूग, कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन, मका आदी पेरणीच्या तयारीत शेतकरी आहे. कृषी विभागाने तालुक्यात यंदा बांधावर तूर लागवडीसाठी प्रेरित केले असून यावर्षी मूग, मका, सोयाबीन पिकांची वाढ होणार आहे.

साकतखुर्द, वाटेफळ, रूईछत्तीसी, दहिगाव, शिराढोण, वाळुंज पारगाव, वडगाव तांदळी आदी परिसरात पेरणीपूर्व मशागतींना वेग आला आहे. तीन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे शेतकरी होरपळला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला तर रब्बी हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला. या संकटाचा सामना करत असतानाच करोनाचा विळखा पडला. त्यामुळे शेती व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला. निदान पुरेसा पाऊस झाल्यावर यावर्षी तरी विस्कटलेली आर्थिक घडी जुळेल या आशेने बळीराजा आता कंबर कसताना दिसत आहे.

खते-बी बियाणासाठी झुंबड
यावर्षी बाजारात मूग बियाणाला मागणी वाढू लागल्याने मूग बियाणे घेण्यासाठी शेतकर्‍यांची झुंबड उडाली आहे. शेतकरी मिळेल तेथून व मिळेल त्या किमतीत बियाणे खरेदी करत आहेत. कडधान्यांच्या वाढलेल्या किंमती लक्षात घेऊन शेतकरी कडधान्य लागवडीला प्राधान्य देत आहेत.

मशागतीसाठी ट्रॅक्टरला पसंती
सलग तीन वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला. दुष्काळात जनावरे जगवायची कशी या भ्रांतेत मोठ्या प्रमाणात पशुधन कमी झाले. बैलांच्या कमतरतेमुळे शेतीकामासाठी आता शेतकर्‍यांकडून ट्रॅक्टरला पसंती मिळत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com