Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्ह्यातील 69 जण अडकले दीड महिन्यांपासून राजस्थानात

जिल्ह्यातील 69 जण अडकले दीड महिन्यांपासून राजस्थानात

अहमदनगर (वार्ताहर ) – जिल्ह्यातील 69 जण राजस्थानमध्ये दीड महिन्यांपासून अडकले असून ते सर्व जण सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना आपल्या गावी आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
नगर जिल्ह्यातील 69 नागरिक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयात सेवक म्हणून सेवा करण्यासाठी गेले होते. सर्व जण 9 मार्च रोजी रेल्वेने दहा दिवस सेवा करण्यासाठी राजस्थानमध्ये पोहोचले. परंतु देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते सर्वजण दीड महिन्यांपासून राजस्थानमध्ये अडकले आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शांतीवन, तलहटी, आबु रोड (राजस्थान) येथील मुख्यालयात सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये अडकलेल्यांपैकी बहुतांश शेतकरी व शेत मजुरी करणारे आहेत. नगर शहर व उपनगरातील सुमारे 50 तर नगर तालुक्यातील जेऊर येथील आठ यासह पाथर्डी, श्रीगोंदा, पैठण, राहुरी येथील नागरिकांचा अडकलेल्यांमध्ये समावेश आहे.
जेऊर येथील माजी सरपंच दिलीप बनकर हे त्यांच्यापैकीच एक आहेत. त्यांनी गावाकडे येण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच राजस्थानमध्ये आमची सर्व सोय करण्यात आली असल्याचेही सांगितले. परंतु दीड महिन्यापासून इकडे अडकुन पडल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. आम्हाला प्रशासनाने गावी नेऊन, मेडिकल चेकअप करुन होम क्वारंटाईन करावे, त्यासाठी आमची तयारी असल्याचे बनकर यांनी सांगितले.
दरम्यान महाराष्ट्र राज्य व राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यात नगर जिल्ह्यातील काही ठिकाणे रेड झोनमध्ये असल्याने राजस्थानमध्ये अडकुन पडलेल्या नागरिकांसाठी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. अडकून पडलेल्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे राजस्थानमध्ये अडकलेल्या नागरिकांना गावी आणण्याची मागणी केली आहे.
राजस्थानमध्ये प्रजापिता ब्रम्हकुमारी इश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्यालयात आम्ही रहात असून येथे सर्व सुविधा मिळत आहेत. सोशल डिस्टंन्सचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. परंतु गावाकडे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. अनेक घरातील कर्ते पुरुष अडकून पडल्याने कुटुंबियांचे हाल होत आहेत.
– दिलीप बनकर, माजी सरपंच, जेऊर
आपत्ती व्यवस्थापन सेलशी याबाबत चर्चा झाली असून राजस्थानमधील संबधित जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– उमेश पाटील, तहसिलदार, नगर.
- Advertisment -

ताज्या बातम्या