नगर जिल्ह्यासाठी 6 कोटींचा अतिरिक्त आमदार निधी उपलब्ध
Featured

नगर जिल्ह्यासाठी 6 कोटींचा अतिरिक्त आमदार निधी उपलब्ध

Sarvmat Digital

अहमदनगर – आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2019-20 या आर्थिक वर्षात 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना मतदारसंघनिहाय 50 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी याप्रमाणे 144 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या वाट्याला 6 कोटींचा निधी आला आहे. याबाबतचे परिपत्रक नियोजन विभागाने जारी केले आहे.

आमदारांना दरवर्षी त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. सन 2019-20 या आर्थिक वर्षात आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व 288 विधानसभा सदस्यांना प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

ऑक्टोबर, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येऊन 288 विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. या सर्व आमदारांना सन 2019-20 च्या उर्वरित कालावधीसाठी त्यांच्या मतदारसंघात आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विकास कामे करण्यासाठी नियोजन विभागाकडून प्रती विधानसभा सदस्य 50 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड असे नगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येकी 50 लाख रूपये प्रमाणे 60 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. हा निधी मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. रस्ते, पाणी, शाळा, कुंपण, स्मशानघाट, जलकुंभ, उद्याने, वाचनालये, शालेय साहित्य आणि इतरही तत्सम कामांसाठी लोकप्रतिनिधी या निधीचा वापर करतात. त्यामुळे विकास कामांना गती येणार आहे.

यांना मिळणार निधी

 • ना. बाळासाहेब थोरात
 • आ. राधाकृष्ण विखे पा.
 • ना. शंकरराव गडाख
 • ना.प्राजक्त तनपुरे
 • आ. आशुतोष काळे
 • आ. लहू कानडे
 • आ.रोहित पवार
 • डॉ. किरण लहामटे
 • आ. मोनिका राजळे
 • आ. संग्राम जगताप
 • आ. बबनराव पाचपुते
 • आ. निलेश लंके
Deshdoot
www.deshdoot.com