अहमदनगर जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ गतिहीन
Featured

अहमदनगर जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ गतिहीन

Sarvmat Digital

शासनाच्या धोरणाबरोबरच उदासीनता कारणीभूत

संगमनेर (वार्ताहर) – वाचाल तर वाचाल असा संदेश देणार्‍या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने सुरू असणार्‍या ग्रंथालय चळवळ अहमदनगर जिल्ह्यात गतिहीन झाल्याचे चित्र आहे. सात वर्षात नव्याने मान्यता देण्यात आलेली नसल्याने वाचन चळवळीला स्थिरता आली आहे. विस्ताराने राज्यात सर्वात मोठ्या असणार्‍या अहमदनगर जिल्ह्यात केवळ 514 ग्रंथालयांद्वारे वाचकांची भूक भागविण्याची वेळ आलेली आहे.

एकीकडे वाचकांची संख्या घटत असताना, वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. वाचनाने समाज शहाणा होतो. मानवी जीवनाला समृद्धता लाभते. त्याकरिता गावोगावी ग्रंथालये सुरू करण्याची भूमिका शासनाने घेतली होती. मात्र गेले सात वर्ष राज्यात नव्याने ग्रंथालयांना मान्यता न देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याच्या विस्ताराची प्रक्रिया लक्षात घेता ग्रंथालयांची संख्या अत्यंत मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.

14 तालुके व एक महानगरपालिका असे क्षेत्र लाभलेले असताना सरासरी प्रति तालुका 35 ग्रंथालय इतकेच प्रमाण राहिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 514 ग्रंथालये आहेत. सध्या सुरू असणार्‍या ग्रंथालयांना आपली वाचक संख्या टिकविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे. वाचकांची पुरेशी संख्या नसेल तर अनुदानात कपात करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागात वाचकांचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

तालुकानिहाय अशी आहेत ग्रंथालये
अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात अवघे 15 ग्रंथालये असून श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी ग्रंथालये 12 आहेत. राहता तालुक्यात 13 ग्रंथालये, सर्वाधिक ग्रंथालये पाथर्डी तालुक्यात असून ही संख्या 74 एवढी आहे. या खालोखाल नगर 64, पारनेर 65, शेवगाव 53, नेवासा 51, कर्जत 28, श्रीगोंदा 23, शेवगाव 55, कोपरगाव 28, संगमनेर 27, जामखेड 19 अशी ग्रंथालय सध्या कार्यरत आहे.

अनुदान पुरेसे
शासनाची मान्यता असलेल्या ग्रंथालयांना शासनाच्या वतीने दरवर्षी अनुदान देण्यात येत असते. जिल्हास्तरीय ‘अ’ श्रेणीतील ग्रंथालयाला सात लाख 20 हजार, तालुकास्तरावरील ‘अ’ श्रेणीतील ग्रंथालयाला तीन लाख 84 हजार, इतर ‘अ’ श्रेणीतील ग्रंथालयाला दोन लाख 88 हजार रुपये अनुदान दिले जाते. जिल्हास्तरीय ‘ब’ श्रेणीतील ग्रंथालयाला तीन लाख 84 हजार, तालुका स्तरावरील ‘ब’ श्रेणीसाठी दोन लाख 88 हजार, इतर ‘ब’ श्रेणीतील ग्रंथालयाला एक लाख 92 हजार, तालुकास्तर ‘क’ श्रेणीत एक लाख 44 हजार, इतर स्तरावर ‘क’ श्रेणीत 96 हजार, ‘ड’ श्रेणीत असलेल्या ग्रंथालयांना 30 हजार रुपये इतके अनुदान दिले जात आहे.

ग्रंथालयासंबंधी तक्रार नोंदवा
जिल्ह्यातील ग्रंथालय नियमित उघडे ठेवणे, वाचकांना ग्रंथालयाच्या सुविधेचा लाभ घेता यावा या दृष्टीने ग्रंथालयाची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. शासनाच्या निकषाचे पालन करण्याच्या दृष्टीने ग्रंथालय विभाग प्रयत्नशील आहे. ग्रंथालय नियमित उघडे राहत नसल्यास अथवा इतर कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ग्रंथालय अधिकारी, सावेडी रोड अहमदनगर येथे तक्रार नोंदवावी असे आवाहन ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले आहे.

वाचकांची संख्या घटत आहे
सध्या सुरू असणार्‍या ग्रंथालयांमध्ये अनुदानातून कर्मचार्‍यांचे वेतन, पुरेशी पुस्तके, नियतकालिके खरेदी करण्यात येत आहेत. अनुदानासाठी शासनाने निश्चित केलेली निकषाचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्यथा अनुदानात कपात करण्यात येते. दरम्यान वाचकांची संख्या घटत असली तरी प्रत्यक्ष वाचकांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र आहे. वाचनाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र असून मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन यासारख्या विविध माध्यमांमुळे पुस्तके हातात घेऊन वाचणे कमी होताना दिसत आहे. वाचन संस्कृती घटत असल्यामुळे त्यांना देखाव्याचे स्वरूप आले आहेत. प्रत्यक्ष वाचन करणार्‍या वाचकांची संख्या रोडवल्याचे ग्रंथपालानी सांगितले.

जिल्ह्यात सर्वाधिक ग्रंथालय ‘ड’ श्रेणीची
शासनाने ग्रंथालयातील पुस्तक संख्या, येणारी नियतकालिके, वर्तमानपत्र, वाचनालयांमध्ये असलेल्या सुविधा अशा निकषावर ग्रंथालयाची श्रेणी निश्चित केली आहे. जिल्हास्तरीय एक ग्रंथालय ‘अ’ श्रेणीत असून, तालुकास्तरावरील ‘अ’ श्रेणीत पाच ग्रंथालये, ‘ब’ श्रेणीतील सहा ग्रंथालय तर ‘क’ श्रेणीत तीन ग्रंथांलयाचा समावेश आहे. इतर सवर्गात ‘अ’ श्रेणीत तीन, ‘ब’ श्रेणीत 64, ‘क’ श्रेणीत 169 तर ‘ड’ श्रेणीत 263 ग्रंथालये यांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com