नगर जिल्ह्यात हुडहुडी

नगर जिल्ह्यात हुडहुडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात थंडीची लाट असून नगरकर गारठून गेले आहेत. शनिवारच्या तुलनेत रविवारी अधिक गारवा जाणवला. थंडी त्यात ढगाळ हवामान यामुळे नगरकरांना रविवारी हुडहुडी जाणवली.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेने येणारे वारे व अरबी समुद्राकडून नैऋत्य दिशेने वारे एकमेकांत विलीन होत असल्यामुळे एक संगम क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे.

या अभिसरणाच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात 30 डिसेंबररोजी विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीपर्यंत या दोन हवामान विभागांत काही प्रमाणात मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. या काळात गारपीटीची शक्यता देखील आहे. दरम्यान, पूर्व मध्य महाराष्ट्रात तुरळक सरींची शक्यता आहे.

प्रामुख्याने नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, लातूर, परभणी आणि औरंगाबाद येथे या पावसाची शक्यता आहे. याउलट कोकण आणि गोवा येथे हवामान प्रामुख्याने कोरडेच राहिल. मुंबई, ठाणे, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे येथे देखील हवामान प्रामुख्याने कोरडेच राहण्याची अपेक्षा असून तुरळक गडगडाटी परिस्थितीची शक्यता आहे.

पुढील काही दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने किमान तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे मुंबई आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. हि हवामानाची परिस्थिती 2 जानेवारीपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com