नगर बाजार समितीत ठोक व्यवसायास परवानगी द्या

नगर बाजार समितीत ठोक व्यवसायास परवानगी द्या

नगर भाजीपाला, फळ आडत्यांच्या असोसिएशनची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार अत्यावश्यक सेवेत येत असल्याने शहरातील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी. शेतकरी व ग्राहकांच्या सोयीसाठी भाजी व फळ बाजार पुर्वीप्रमाणे मुख्य मार्केटमध्ये भरविण्याची मागणी नगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनने केली आहे.

असोसिएशनच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांना देण्यात आले. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, फळे, फुले इत्यादींचा होलसेल व्यापार परंपरागत चालू आहे. करोना महामारीचे संक्रमण थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आवहानाला प्रतिसाद देत लॉकडाऊन काळात बाजार समिती आवारात गर्दी होत असल्याने व्यापार्‍यांनी व्यवसाय बंद ठेवले होते.

मात्र, लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाला असून, यामध्ये अनेक व्यापार व उद्योजकांना सवलती देऊन ते सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार अत्यावश्यक सेवेत येते. शेतकरी, शेतीपूरक व्यावसायिक व कामगारांचे अर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय व भाजीपाला विभाग पुरवठा सुरळीत सुरु करण्याची परवानगी मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी माजी संचालक नंदकिशोर शिकरे, असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे, पिनू कानडे, गणेश लालबागे, अनिलकुमार बजाज, सुनील शेलार, विजू मेजर, नंदू बोरुडे, मोहन गायकवाड, अशोक निमसे, तानाजी कर्पे, विकास तिवारी, किशोर बोडखे, अनिल ठुबे, पियुष कर्डिले, संभाजी शिंदे, दर्शन विधाते आदींसह व्यापारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com