नाफेडला 50 हजार मेट्रीक टन कांदा खरेदीला परवानगी
Featured

नाफेडला 50 हजार मेट्रीक टन कांदा खरेदीला परवानगी

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- कांद्याच्या कोसळत्या भावाला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडला 50 हजार मेट्रिक टन कांदा खरेदीला परवानगी दिली असलीतरी यंदा विक्रमी उन्हाळ कांद्याचे उत्पादन होणार आहे. त्यात लॉकडाऊनमुळे बाजार समित्या आणि शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक आहे. तसेच रमजान महिन्यात कांद्याची मागणी घटणार आहे. त्यामुळे नाफेडची 50 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी तुटपुंजी ठरण्याची भीती कांदा उत्पादक करीत आहेत.

मागील वर्षी कांद्याला मिळालेला चांगला बाजारभाव बघता आणि यावर्षी परतीच्या पावसाने दीर्घकाळ हजेरी लावल्याने नगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहाता, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदा आणि अन्य तालुक्यांत लाल सह उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन होणार आहे. यावर्षी उन्हाळ कांदा मे महिन्यात काढणीस येईल. अशावेळी काढणीस आलेला हा कांदा साठवणुकीची कुठलीही व्यवस्था शेतकरी, व्यापारी यांच्याकडे राहणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 50 टक्के बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत हजारो क्विंटल कांदा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असून मे महिन्यात विक्रमी आवक होणार आहे.

केंद्र शासनाने नाफेडला 50 हजार मे टन कांदा खरेदीची परवानगी दिली असली तरी यातील 5 हजार मे टन कांदा गुजरातमधून तर उर्वरीत 45 हजार मे टन महाराष्ट्रातून खरेदी केला जाणार आहे. नाफेडची कांदा खरेदी प्रक्रिया ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. आजच्या परिस्थितीत कोरोनामुळे चीनचा कांदा येत नसल्याने ही समाधानाची बाब असली तरी आज कांद्याला अवघा 800 ते 900 रुपये क्विंटल भाव मिळत असून पुढील महिन्यात हे भाव आणखी गडगडण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com