नाफेडच्या कांदा खरेदी केंद्राचा राज्यात पहिला मान कर्जत-जामखेडला
Featured

नाफेडच्या कांदा खरेदी केंद्राचा राज्यात पहिला मान कर्जत-जामखेडला

Sarvmat Digital

आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रथम कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन

कर्जत (तालुका प्रतिनिधी)- नाफेडकडून कांदा खरेदी केंद्राचा राज्यात पहिला मान हा आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत-जामखेडला मिळाला आहे. त्यामुळे या पुढील काळात ‘कांद्याचा वांदा’ होणार नसल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. आता नॅशनल ग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अर्थात ‘नाफेड’ या संस्थेमार्फत कांदा खरेदीला सुरुवात देखील झाली आहे. जामखेड तालुक्यातील राजुरी गावातील डोळेवाडी येथे पहिल्या कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. रोहित पवार यांच्या हस्ते झाले.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव व राशीन या ठिकाणीही खरेदी केंद्रे असून पुढील काळात आणखी दोन अशी एकूण पाच खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांनी आ. पवारांकडे कांदा खरेदी केंद्राची मागणी केली होती. त्यावर आ. पवारांनी लॉकडाऊनच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबंधित कंपन्यांचे अधिकारी आदींशी बैठका घेऊन व पाठपुरावा करून ही कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

कांद्याचे विक्रमी उत्पादन होते. मात्र योग्य बाजारभाव, शेतकर्‍यांना विक्रीचा पर्याय मिळावा, वाहतुक, बाजारपेठा आदी प्रश्नांना तोंड देत शेतकर्‍यांना अनेक वेळा भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणार्‍या आ. रोहित पवारांनी कांदा खरेदी केंद्राबाबत महत्वाचे पाऊल टाकत कोणत्याही कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे.

शेतकर्‍यांच्या बांधावर कांदा खरेदी करताना या खरेदीतुन काही टक्केवारी ही या केंद्रांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. नाफेडकडून नगर तसेच कर्जत-जामखेड परिसरातील कांदा खरेदी केला जाणार आहे. कांद्याचा बाजारभाव सध्या 4 रुपयांवर आलेला आहे. महा-एफ.पी.सी.च्या मदतीने खरेदी होणार्‍या कांद्याचा बाजारभाव अंदाजे 8 रुपयापासून सुरू होऊन पुढे बाजारभाव असेल तसा तो शेतकर्‍यांना मिळणार आहे.नाफेडच्या नियमानुसारच ही कांदा खरेदी होणार आहे. शेतकर्‍यांच्याच कांदा चाळी भाडे तत्वावर घेऊन त्याचाही मोबदला नाफेडकडून मिळणार आहे.

दरम्यान कर्जत जामखेडचा बराचसा भाग सिंचनाखाली आल्याने कांद्याचे क्षेत्रात वाढ झालेली आहे. एकूण राज्यातील कांदा खरेदीचा विचार करता नाफेड अंतर्गत महा-एफ.पी.सी.च्या मदतीने कर्जत-जामखेडमध्ये कांदा खरेदी होत असल्याने आ. रोहित पवारांच्या कौशल्याचे कौतुक होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com