वाहने मर्यादित वेगाने न चालविल्यास चोप देऊ
Featured

वाहने मर्यादित वेगाने न चालविल्यास चोप देऊ

Sarvmat Digital

राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक ग्रामस्थांनी घेतला बैठकीत निर्णय

नांदुर्खी (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील नांदुर्खी परिसरात शिर्डी-काकडी विमानतळ रस्त्यावरून भरधाव येणार्‍या वाहनांमुळे कायमच अपघात होत असतात. या वाहन चालकांनी यापुढे या मार्गाने जात असताना आपल्या वाहनांचा वेग मर्यादित न ठेवल्यास या वाहन चालकांना चोप देऊ, असा इशारा नांदुर्खी ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिला आहे.

महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सोन्याबापू चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. काकडी विमानतळ ते शिर्डीकडे येणार्‍या रस्त्यावर दररोज अनेक वाहने ये-जा करत असतात. शिर्डी विमानतळावर रोज देश-विदेशातून साईभक्त विमानाने येत असतात. विमानतळावरुन त्यांना घेऊन येणारी वाहने या रस्त्यावरुन दररोज अतिवेगाने वाहन चालत असल्यामुळे रोज या परिसरात एक ना एक अपघात होत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी या परिसरातून जात असलेल्या वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा वेग मर्यादित ठेवून प्रवास करावा अन्यथा वाहन चालकांना चोप देऊ, असा इशारा नांदुर्खीच्या सरपंच विद्याताई चौधरी यांनी दिला आहे.

गेल्या एक वर्षापासून या परिसरातील नागरिकांना विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी असलेल्या चौकातच शाळा असल्यामुळे या वाहनांपासून विद्यार्थी असुरक्षित असतात. म्हणून या सर्व गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागत आहेत, असे सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव चौधरी यांनी सांगितले.

या अगोदरही नांदुर्खी ग्रामपंचायतीमार्फत संबंधित विभागाला व वाहनांना वेग मर्यादित ठेवा, रस्त्यावर गतिरोधक बसवा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र याप्रश्नी संबंधित विभाग दखल घेत नाही म्हणूनच नांदुर्खी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला असल्याचे योगेश चौधरी यांनी सांगितले.

यासाठी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी, शिर्डी पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, राहाता पोलीस स्टेशन, काकडी विमानतळ प्राधिकरण यांना निवेदने देण्यात येणार असून 8 दिवसात सुधारणा न झाल्यास नांदुर्खी रोडवरील चौकामध्ये अशा अतिवेगाने वाहन चालकांना चांगलाच चोप दिला जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com