ना. थोरात यांनी केली परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था
Featured

ना. थोरात यांनी केली परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी)- करोना संकटामुळे देशात व राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यांमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला असून संगमनेर व परिसरातील मजुरांना सोशल डिस्टन्स व शासनाचे नियम पाळून प्रवासाची व्यवस्था करत मदतीचा हात दिला आहे.

संगमनेर बसस्थानक या ठिकाणाहून मध्यप्रदेशमधील 95 परप्रांतीय मजुरांना जाण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या बस उपलब्ध करून व फुड पॅकिंग, प्रवास खर्चाची व्यवस्था करत महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी मदतीचा हात दिला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, युवक काँग्रेसचे सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे निखिल पापडेजा, नगरसेवक शैलेश कलंत्री, सतीश आहेर, गौरव डोंगरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी देशभरातील मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी काँग्रेस प्रदेश कमिटीने व्यवस्था करावी अशी सूचना दिल्या होत्या. यानुसार ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जिल्हानिहाय परप्रांतीय मजूर यांची यादी करून त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासाची व्यवस्था केली आहे.

हा सर्व खर्च महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उचलणार आहेत. यानुसार संगमनेर तालुका व परिसरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचण्याकरता संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या. यानुसार सोशल डिस्टन्स व शासनाचे सर्व नियम पाळून संगमनेर बस स्थानकावरून 95 परप्रांतीय मजुरांना घेवून या बस अहमदनगरकडे रवाना झाल्या. या वेळी उपस्थित मजुरांना खाद्य पाकिट व प्रवास खर्च देण्यात आला. अहमदनगर येथून हे सर्व परप्रांतीय मजूर रेल्वेने मध्यप्रदेश या ठिकाणी जाणार आहेत.
यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, करोना हे मानवजातीवरील संकट आहे.

अशा काळामध्ये केंद्र व राज्य सरकार अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. अनेक परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात अडकले होते. त्यांना घरी जाण्याची ओढ आहे. मात्र सरकारने राज्यात आहे त्या ठिकाणी परप्रांतीय मजुरांसाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे. आज अनेक परप्रांतीय मजूर पाईपाई चालत घराकडे निघाले आहेत. यामध्ये अनेक स्त्रिया, लहान मुले यांचे खूप हाल होत आहेत. खरे तर मजुरांनी संयम धरावा. आहे त्याच ठिकाणी थांबावे. सरकार व काँग्रेस पक्ष आपल्यासाठी जाण्याची व्यवस्था करत आहेत.

नामदार बाळासाहेब थोरात यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मजुरांनी आहे त्या ठिकाणी थांबून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. इंग्रजीत थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांकरीता नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजनाची व्यवस्था अनेक दिवसापासून सुरू आहे. अनेक गरजू हातावर उपजीविका असणार्‍यांना सेवाभावी संस्था मदत करत आहेत. भोजनाची व्यवस्था पुरवली जात आहेत. आता परप्रांतीय मजुरांना या परतीसाठी मदत केली आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी या सर्व परप्रांतीय मजुरांना भावनिक होत निरोप दिला.

यावेळी सर्व सर्व परप्रांतीय मजुरांनी कृतज्ञतापुर्वक नामदार बाळासाहेब थोरात व संगमनेरकर यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.

Deshdoot
www.deshdoot.com