बाजारपेठ सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करावे
Featured

बाजारपेठ सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करावे

Sarvmat Digital

श्रीरामपुरातील आढावा बैठकीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आवाहन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या संकटातून लोकांना दिलासा मिळून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी राज्य सरकारने काही अटींवर उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. श्रीरामपूर शहरातील उद्योग व्यवसाय सुरू करण्याबाबत सर्वांना सोयीचे असे नियोजन स्थानिक पातळीवर करावे, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू असल्याने राज्य शासनाने या काळातही काही उद्योजक, व्यापारी, लहान मोठे व्यावसायिक यांना बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, श्रीरामपूर येथील बाजारपेठ पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्याबाबतीत आणि करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ना. तनपुरे यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, महसूल, पोलीस व आरोग्य अधिकारी यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी यांच्यासमवेत आढावा बैठक घेऊन चर्चा केली व मार्गदर्शक सूचना केल्या.

या बैठकीसाठी आ. लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, महावितरणचे कार्यकारी अभियंता शरद बंड, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक राजेंद्र पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पं. स. सदस्य अरुण नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, बाजार समिती संचालक सचिन गुजर, सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, मुन्ना पठाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी शहरातील उद्योग व्यवसाय सुरु करताना येणार्‍या अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबत सांगोपांग चर्चा झाली. राहुरी शहरात योग्य नियोजन करून बाजारपेठ सुरू केली आहे. त्यानुसार श्रीरामपूर येथेही सरकारी नियमांचे पालन करून बाजारपेठ सुरू करा. त्यासाठी स्थानिक मंडळींनी एकत्र बसायला हवे. तसेच करोनाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, करोनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, खबरदारी हाच याबाबतचा उपाय असल्याने सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी ही दक्षता घेण्याची गरज आहे. त्यामुळे येथील बाजारपेठ सुरू करताना सर्व सरकारी नियमांचे पालन करूनच बाजारपेठ सुरू करावी, अशी अपेक्षाही ना. तनपुरे यांनी व्यक्त केली.

करोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन पुरेशा उपाययोजना केल्या आहेत. त्यात सरकार कोठेही कमी पडणार नाही. असा ठाम विश्वासही तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या चर्चेत महसूल, पोलीस, आरोग्य, लोकप्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. श्रीरामपूर सारख्या मोठ्या नगरपालिकेला कायम मुख्याधिकारी नेमण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी ना. तनपुरे यांच्याकडे केली.

Deshdoot
www.deshdoot.com