Friday, April 26, 2024
Homeनगर‘स्मार्ट सिटी’ऐवजी राहुरीची बकाल खेड्याकडे वाटचाल

‘स्मार्ट सिटी’ऐवजी राहुरीची बकाल खेड्याकडे वाटचाल

ना. तनपुरेंच्या एकाधिकारशाहीमुळे शहराचा विकास रखडला; सत्ताधार्‍यांमध्येच नाराजी

राहुरी (प्रतिनिधी)- नगराध्यक्ष होण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे अभिवचन दिले. मात्र, आता मंत्रिपद मिळूनही राहुरी शहराचा चेहरामोहरा बदलला नाही. ना. तनपुरे यांचे दुर्लक्ष झाल्याने राहुरी शहराची वाटचाल स्मार्ट सिटीऐवजी बकाल खेड्याकडे सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर मंत्रिपदापर्यंत पोहोचून ना. तनपुरे यांचा राजकीय उद्धार झाला. मात्र, राहुरी शहराची प्रगतीच्यादृष्टीने पिछेहाट सुरू झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

- Advertisement -

राहुरी शहराला अद्यापही पाणी योजनेचा निधी मिळाला नसल्याने राहुरीकरांचा घसा अद्यापही कोरडाच राहिला आहे. एकीकडे पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करून नागरिकांच्या खिशाला कात्री लावणार्‍या राहुरी नगरपालिकेला नागरिकांसाठी सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अपयश आले आहे. गेल्या चार दिवसांपासून राहुरी नगरपालिकेचा पाणीपुरवठा विजेचे खांब पडल्याने बंद आहे. नागरिकांना मनःस्ताप होत असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने स्मार्ट सिटीच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.

तर नागरिकांना सिग्नलचे स्वप्न दाखविले. मात्र, सिग्नलच बसविले नसल्याने ते दिवास्वप्न ठरले आहे. नगरपालिकेने लावलेले दिशादर्शक फ्लेक्स बोर्डही आता गायब झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांचाही विचका झाला आहे. ना. तनपुरे यांना त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे राहुरी शहराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भूमिगत गटारांचेही भिजत घोंगडे पडले आहे. विकास कामांऐवजी राहुरी नगरपालिका राजकारणाचा अड्डा बनला आहे. ना. प्राजक्त तनपुरे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या नगरपालिकेत सत्ताधारी नगरसेवकांमध्येच मोठी नाराजी आहे. मात्र, कोणीही नाराजी व्यक्त करण्याचे धाडस करीत नसल्याची कबुली एका समर्थकाने दिली आहे.

शहराचा पाणीपुरवठा अनेकदा खंडित होतो. परिणामी पाणीपट्टी वाढ होऊन नागरिकांना पाण्यासाठी दशदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. पालिकेअंतर्गत असलेल्या पाणी योजनेसाठी 1.5 कोटी रुपयांची सोलर योजना राबविल्यास पालिकेला दर महिन्याला आकारला जाणार्‍या वीज बिलाचा भार कमी होईल. पर्यायाने नागरिकांवरील पाणीपट्टीचा वाढत जाणारा बोजा कमी होऊन पालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे.

तसेच महावितरणकडून अनेकदा वीजपुरवठा करताना अडचणी निर्माण होतात. मागील आठवड्यात झालेल्या चक्रीवादळाने वीज प्रवाह खंडित झाला होता. राहुरी शहरात आठवडाभर पाण्याची टंचाई सहन करावी लागली. त्यापेक्षा पालिका प्रशासनाची हक्काची सोलर योजना असल्यास पाणी पुरवठा खंडितही होणार नाही, असा नागरिकांचा सूर आहे. मात्र, पालिकेत विकास कामे करण्यास ना. तनपुरे यांची उदासिनता शहराला मारक ठरत असून नागरिकांमधून मात्र, टिकेचा सूर उमटू लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या