Friday, April 26, 2024
Homeनगरनेवाशात ना. गडाख यांनी घेतली कोरोना आढावा बैठक

नेवाशात ना. गडाख यांनी घेतली कोरोना आढावा बैठक

तातडीची गरज असलेल्या नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घ्या; प्रशासनाला सूचना

नेवासा (तालुका वार्ताहर) – कोरोनामुळे सर्वत्र गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. नागरीकांनी स्वता दक्षता घेणे अवश्यक तर आहेच परंतु सध्या मुळा कालव्याला पाणी चालू असल्याने शेतकर्‍यांची अडचण होवू नये याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सुचना जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी देत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेवासा शहर हॉटस्पॉट घोषित केले असल्याने नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून आपल्या भविष्यासाठी त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी शहरवासियांना केले आहे.

- Advertisement -

नामदार शंकरराव गडाख यांनी बैठक घेवून आढावा घेतला. त्यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी उपस्थित होते. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तालुक्याच्या सद्य परिस्थीती नामदार गडाख यांच्या समोर मांडली. शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये यासाठी शहरात हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला आहे. त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना करत असून ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने लक्ष ठेवले जात आहे. नामदार शंकरराव गडाख यांनी देखील प्रशासनाच्या कार्याचे दखल घेत कौतुक करतानाच तातडीची गरज असणार्‍या नागरिकांना विनाकारण प्रशासनाकडून त्रास होणार नाही याची काळजी घेवून योग्य ती खातरजमा करूनच कारवाई करावी, अशा सुचना दिल्या.

नामदार गडाख म्हणाले की जनतेला अवश्यक असणारी आरोग्य सेवा तातडीने मिळावी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नागरीकांना सहजतेने उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जावे. स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना मिळणारे धान्य शेवटच्या घटकापर्यंत मिळाले पाहिजे त्याकडे पुरवठा विभागाने लक्ष देवून तालुक्यात कोणीही वंचीत राहणार नाही याची दक्षता घेतली जावी. कोरोनामुळे परिस्थीती नाजूक झाली असली तरी शेतकरी जगला तर सगळे चक्र सुरळीत चालणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याची तिव्रता वाढत असल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे.

त्यासाठी मुळा धरणाचे आवर्तन सुटलेले आहे. हे आवर्तन हातातून गेले तर पिके जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थीतीत देखील प्रशासनाने शेतकर्‍यांना फार जाचकतेची भुमिका न घेता शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेवून त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.

नामदार गडाख यांनी शहरात व तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थीतीची माहीती घेत किती रूग्ण दाखल झाले, कीती जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यात याची माहिती घेवून उपचार व इतर काही अडचणी आहेत का याची माहिती घेतली. या गंभीर परिस्थीतीत देखील जनतेच्या सेवेसाठी परिश्रम घेणार्‍या पोलीस, आरोग्य, प्रशासन व पत्रकारांच्या कामाचे त्यांनी कौतूक करत नागरिकांनी देखील सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या