मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे- ना. आठवले
Featured

मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे- ना. आठवले

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी)- मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे.

संगमनेर येथे पत्रकार परिषदेत बोलतांना रामदास आठवले यांनी हा सल्ला दिला. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असं आठवले म्हणाले. भाजपने मनसेबरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही आठवले यांनी केली.

आम्ही भाजपबरोबर आहोत, पण राज्यातलं तीन पक्षाचं सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असून आता सरकारमध्ये किती काळ राहायचं हे या तिन्ही पक्षांनाच ठरवावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी आठवले यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला (एनसीआर) पाठिंबा दिला. एनसीआरमुळे देशातील मुस्लिमांना कोणताही त्रास होणार नाही. एनसीआरबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मुस्लिमांना त्रास देणारा हा कायदा नाही. काँग्रेस मुस्लिमांना भडकवत असल्यामुळेच मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरले आहेत. मुस्लिमांनी काँग्रेसच्या जाळ्यात अडकून स्वत:चे नुकसान करून घेऊ नये, असंही ते म्हणाले.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय समितीने पाहणी केली. मात्र अद्याप केंद्राकडून शेतकर्‍याला मदत मिळाली नाही या प्रश्‍नावर ना. आठवले म्हणाले, शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले हे खरे आहे. केंद्रीय पातळीवरुन समितीने येवून पाहणी केली असून तसा अहवाल केंद्राला सादर केला आहे.

केंद्राकडून शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्न करु, मात्र राज्याने देखील शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे असेही ते म्हणाले.

यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, संगमनेर तालुकाध्यक्ष अशिष शेळके, श्रावण वाघमारे, दिपक गायकवाड, भिमराव बागुल, राजाभाऊ कापसे, कैलास कासार, विजयराव वाकचौरे आदि पदधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com