शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज- ना. आठवले
Featured

शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज- ना. आठवले

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी)- लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता जय जवान -जय किसानचा नारा, तेंव्हा जागा झाला भारत सारा, ‘आपण अनेक वर्षे केला नाही आळस, त्यामुळे कृषी प्रदर्शनाने प्रसिध्द झाले कळस, अशा काव्य पंक्ती सादर करत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य पातळीवरील ग्रामीण भागातील सर्वात मोठे असे नावलौकिक असणार्‍या कळस कृषी प्रदर्शनाचे उदघाटन केले. अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला राज्य सरकारने मदत करण्याची गरज ना. आठवले यांनी व्यक्त केली.

अकोले शहराजवळील रेडे शिवारातील नव्याने उभारण्यात आलेल्या विठ्ठल लॉन्स येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन काल उत्साही वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोर्‍हाडे होते. यावेळी व्यासपीठावर बीजमाता राहीबाई पोपेरे, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, उद्योजक नितीन गोडसे, भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. आठवले म्हणाले, राज्यात यंदा सर्वदूर मोठा पाऊस झाला. पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसानेही शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या पाठीमागे उभे राहून मदतीची गरज आहे. शेतकरी जगला तर आम्ही जगू असे सांगतांना रात्र-दिवस कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नद्या जोड ची कल्पना मांडली होती ती प्रत्यक्षात आली असती तर पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला नसता असेही त्यांनी सांगितले.

माझ्या सारख्या होस्टेल मध्ये राहणारी व्यक्ती तीन वेळा खासदार, मंत्री झालो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी जो पर्यंत बरोबर आहोत तोपर्यंत विरोधक कितीही एकत्रित आले तरी काही फरक पडणार नाही. 2024 साली पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार असा विश्‍वास ही त्यांनी बोलून दाखविला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आपले आता जमत नाही, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांचे ऐका पण आमचेही थोडे ऐका असे म्हणतात उपस्थितांत एकच हशा पिकला.

राहीबाई पोपेरे म्हणाल्या, मी अशिक्षित असतांना सुध्दा मला सगळीकडे भाषणाला बोलवतात, हा मी अकोले तालुक्याचा बहुमान समजते. विषमुक्त शेतीचा प्रयोग राज्य व बाहेरूनही लोक माझ्याकडे येत असतात. शेतकर्‍यांनी आता सेंद्रिय शेताकडे वळावे, आपल्या शेतीचे आरोग्य जपले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कळस कृषी प्रदर्शनात सुरुवातीला आपला सेंद्रिय शेतीचा स्टॉल लावल्याची आठवण ही त्यांनी करून दिली.

ग्रामीण भागातील शेतकरी यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान माहीत व्हावे साठी ग्रामीण भागातील शेतकर्‍याच्या मुलांनी एकत्र येऊन छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन विभाग, ऊर्जा विभाग यांच्या सहकार्याने कळस कृषी प्रदर्शन सुरू केले गेले. पाच वर्षांपासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.

प्रास्ताविक व स्वागत सागर वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन दिनेश चव्हाण यांनी केले तर आभार अवधुत वाकचौरे यांनी मानले.
प्रारंभी ना. आठवले यांना सजविलेल्या जीप गाडीतून वाजत गाजत प्रदर्शन स्थळी आणण्यात आले. अग्रभागी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने लक्ष्य वेधून घेतले.

या वर्षी च्या कृषी प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे कृषी प्रदर्शन, डांगी व खिलार जनावरे यांचे प्रदर्शन खरेदी विक्री, घोडे सवारी, बैलांचा फॅशन शो, उत्कृष्ट गाय निवड, मशिनरी प्रदर्शन, महिला महोत्सव, खाद्य महोत्सव, अकोले महोत्सव, बाल आनंद नगरी असे विविध प्रकारचे आहेत. या प्रदर्शनाचे पन्नास हजार विद्यार्थ्यांना व पन्नास हजार महिला पालक यांचे साठी एक लाख मोफत पास चे वाटप करण्यात आले आहे.

या प्रदर्शनासाठी सहकार्‍यांसह मोठ्या प्रमाणात कष्ट करणारे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे सागर वाकचौरे यांना प्रास्ताविकात या सर्व आठवणी सांगतांना करतांना अश्रू दाटून आले व बोलणे अशक्य झाले.

कृषी प्रदर्शनासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती युवा प्रतिष्ठान ला ना. रामदास आठवले यांनी 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

Deshdoot
www.deshdoot.com