टिळकनगर : पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
Featured

टिळकनगर : पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Sarvmat Digital

कौटुंबीक वाद, श्रीरामपुरातील दत्तनगरची घटना

टिळकनगर (वार्ताहर)- वारंवार होणार्‍या कौटुंबीक वादातून पतीने झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिची हत्या केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे घडली. तर सायंकाळच्या सुमारास पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. राजन अरुण गायकवाड असे या पतीचे नाव तर पत्नीचे नाव शिल्पा राजन गायकवाड आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काल राजन आपल्या दत्तनगर येथील राहत्या घरी दुपारच्या सुमारास आला असता पत्नी शिल्पा झोपलेली होती. साधारण दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घरात असलेल्या दगडी पाट्याने पत्नी शिल्पाच्या डोक्यात राजन याने दगडी पाटा टाकला. घरात असलेल्या राजन याच्या लहान मुलीने वडिलांचे कृत्य पाहताच घरातून जोरजोरात आरडाओरडा करीत काही अंतरावर असलेल्या आपल्या आजीच्या घरी घडलेला प्रकार कथन केला. नातलग घटनास्थळी आले असता शिल्पा रक्ताच्या थारोळ्यात अत्यवस्थ अवस्थेत होती.

नातलगांसह सरपंच सुनील शिरसाठ यांनी शिल्पा हिस तातडीने श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात हलविले. मात्र येथील डॉक्टरांनी शिल्पा हिची प्रकृती गंभीर असल्याने लोणी रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र रात्री लोणी येथील रुग्णालयात शिल्पा हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर पती राजन हा पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सायंकाळच्या सुमारास संजयनगर परिसरातील आदर्श कारखान्याच्या रेल्वे गेटसमोर राजन यानेही रेल्वेखाली आत्महत्या केली आहे.  दरम्यान, दुपारी दत्तनगर येथील घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी पाहणी केली. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com