Friday, April 26, 2024
Homeनगरमुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू

मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू

निळवंडेतून दोन-तीन दिवसांनी पाणी सोडणार

राहुरी, भंडारदरा (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून काल सायंकाळी 6 वाजता 760 क्युसेकने शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. उजव्या कालव्यातून आज गुरूवारी सकाळीच 100 क्युसेकने पाणी सोडलेले असेल. दरम्यान, निळवंडे धरणाच्या दरवाजाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या धरणातून दोन-तीन दिवसांनी आवर्तन सोडण्यात येणार आहे.

- Advertisement -

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज (बुधवारी) सायंकाळी सहा वाजता 760 क्युसेकने आवर्तन सोडले आहे, अशी माहिती धरण शाखा अधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. डाव्या कालव्यातून उद्या (गुरुवारी) सकाळी सहा वाजता शंभर क्युसेकने आवर्तन सुटलेले असेल.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे राहुरी, नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील रब्बी पिकांचे तीस हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल. उजवा कालव्याची वहन क्षमता 1650 क्युसेक आहे. सध्या 760 क्युसेकने सुरू केलेले आवर्तन टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. चाळीस दिवस आवर्तन चालेल. धरणातून चार हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल.

डाव्या कालव्याद्वारे राहुरी तालुक्यातील पाच हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होईल. या कालव्याची वहन क्षमता तीनशे क्युसेक आहे. उद्या (गुरुवारी) सकाळी सहा वाजता शंभर क्युसेकने आवर्तन सुरू होऊन टप्प्याटप्प्याने पाणी वाढविले जाईल. धरणातून डाव्या कालव्याद्वारे 500 दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात आवर्तन सोडतेवेळी 25187 दलघफू पाणी होते. हे आवर्तन रब्बी पिकांसाठी आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणात कधी नव्हे एवढा मुबलक साठा आहे. 11000 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात 10817 तर 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत 7982 दलघफू म्हणजे 18799 दलघफू पाणी उपलब्ध आहे. वाकी तलावातही 703 दलघफू (83 टक्के) पाणीसाठा आहे.

निळवंडेतूनही 22 जानेवारीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र निळवंडे धरणाच्या दरवाजाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. ते पूर्ण होण्यास दोन-तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे काम झाल्यानंतर आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या