Saturday, April 27, 2024
Homeनगरवीज महावितरण कंपनीकडून झाडांची कत्तल

वीज महावितरण कंपनीकडून झाडांची कत्तल

वनविभागाचे दुर्लक्ष; वृक्षप्रेमी आंदोलनाच्या तयारीत

सोनेवाडी (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सोनेवाडी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या सामाजिक वनीकरणाच्या झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करण्यात येत आहे. विज महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनीच केवळ झाडांच्या लाकडांच्या मोबदल्यात काही लोकांकडून ही कत्तल करून घेत असलेली घटना उघडकीस आली आहे. वन विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले असून वृक्षप्रेमींनी झाडांची होणारी कत्तल थांबवली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

वन विभागाने सामाजिक वनीकरणाच्या मार्फत सोनेवाडी ते पोहेगाव रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. गेली तीन वर्षे या झाडांचे संगोपन करत त्यांनी उन्हाळ्यातही टँकरने पाणी घातले. आता झाडांची पूर्णक्षमतेने वाढ झाली असून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना सावली देण्याचे काम हे झाडे करत आहे. मात्र वाढलेली झाडे वीज वितरण कंपनीने टाकलेल्या सोनेवाडी, पोहेगाव शिवारातील नवसारी येथील तारांना टेकत असल्याचे कारण दाखवीत वीज वितरणच्या अधिकार्‍यांची नजर या झाडांवर पडली. स्थानिक वृक्ष तोडणार्‍या लोकांना हाताशी धरत त्यांनी केवळ सरपणाच्या बदल्यात या काही झाडांची 60 टक्के कत्तल केली.

सामाजिक वनीकरणानेही वाढलेली झाडे मोजणी करून गेरु व चुन्याने त्यांचे खोड रंगवायला पाहिजे होते. मात्र तसे केल्याचे दिसून येत नाही. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी लोकांना वीजही लागते आणि झाडेही लागतात आम्ही करायचे काय? असा उलट प्रश्न केला. मात्र वाढलेल्या झाडांची फक्त फांदी तीही वीज वितरण कंपनीच्या पोलकडे जात असल्यास तोडायला पाहिजे मात्र तसे न होता अर्धे झाडेच या महाशयांनी तोडून टाकले आहे.

मागील वर्षीही या झाडावर कुर्‍हाड लावण्याचे प्रयत्न झाले; परंतु त्यावेळी स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत या झाडांना जीवदान दिले. मात्र यावर्षी लॉकडाऊनचा असल्याने सर्व नागरीक घरात असल्याने या गोष्टीचा फायदा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी घेतला आणि या झाडांची दिवसाढवळ्या कत्तल चालू केली.

वनविभाग व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोहेगाव, सोनेवाडी रस्त्यावर लावलेल्या वनविभागाच्या झाडांची कत्तल ताबडतोब थांबवावी, अशी मागणी स्थानिक वृक्षप्रेमीनीं केली आहे. जर झाडांची कत्तल थांबवली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोहेगाव सोनेवाडी नऊचारी परिसरात सामाजिक वनीकरणाच्या मार्फत त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली आहेत. ही झाडे तब्बल चार वर्षाची झाली असून या झाडांची कत्तल गेल्यावर्षीही करण्याचा प्रयत्न वीज वितरण कंपनीकडून झाला होता. परंतु यावर्षी लॉकडाऊनच्या काळात केवळ वीज वितरण कंपनीच्या तारांना टच होणार्‍या फांद्या तोडण्याच्या नावाखाली अर्धे झाडच तोडले जात आहे. ही बाब खूप गंभीर असून प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार म्हणते झाडे लावा झाडे जगवा मग यांना झाडे तोडण्याचा अधिकार कोणी दिला. या वृक्षतोडीचा कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तलाठी यांना महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून पंचनामा करून दोषींवर कारवाई करावी.
– पी. डी. आहेर, वृक्षप्रेमी

- Advertisment -

ताज्या बातम्या