वर्षभरात पुणे-नगर इंटरसिटी रेल्वे सेवा
Featured

वर्षभरात पुणे-नगर इंटरसिटी रेल्वे सेवा

Sarvmat Digital

डॉ. खा. सुजय विखे : जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात घेतली बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याचा मानस असून प्रत्यक्षात एक वर्षातच ही सेवा सुरू केली जाईल. तसेच जामखेडमध्ये रेल्वेच्या लाईनच्या कामासाठी कोणाचीही घरे पाडली जाणार नाहीत किंवा त्यांची जागा घेतली जाणार नाही. नागरिकांनी भीती बाळगू नये, आम्ही जनतेच्या बाजूने आहोत, असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील नगरमध्ये व्यक्त केला.

जिल्ह्यातील रेल्वे संदर्भात विविध प्रश्नांसंदर्भात शनिवारी खा. विखे यांनी बैठक घेतली. यावेळी सोलापूर विभागाची रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता, मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे, मंडल अभियंता सचिन गणेर, स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर, सुवेंद्र गांधी आदी उपस्थित होते.

खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, पुणे-मनमाड दुहेरीकरण याचा विषय सुरू झालेला आहे. लवकरच दुहेरीकरण होईल, यासाठी सरकारने निधीची तरतूद केलेली आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपये लागणार आहेत. हे लवकरात लवकर पूर्ण झाले तर नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे तात्काळ सुरू केली जाईल. तसेच दौंड येथे काही जमीन अधिग्रहणाचा विषय प्रलंबित आहे. तो खा. सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मार्गी लावला जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

ज्या पॅसेंजर गाड्या किंवा इतर गाड्या बंद झाल्या आहेत, त्या कशा सुरू करता येतील, तत्कालीन खासदार गांधी यांच्या काळामध्ये जे कामे प्रलंबित होती, तेच आधी मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.

नगर जिल्ह्यामध्ये रेल्वेचे थांबे वाढले पाहिजे. त्यासाठी जे जे महत्त्वाचे स्टेशन आहेत, त्याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे. श्रीगोंदा- बेलवंडी या भागामध्ये निकृष्ट अंडरग्राउंड ब्रिजच्या सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये जे रेल्वेच्या ब्रिज उभारण्यात आलेले आहे, त्याचे तात्काळ ऑडिट होईल, यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जामखेड-आष्टी रेल्वे मार्गासाठी जामखेड मधील 400 घरे पडणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. हा चुकीचे असून जामखेडमध्ये अशी कोणतीही रेल्वेचा विषय नाही. नगर-परळी रेल्वे मार्गाच्या संदर्भात आपल्याकडून कामे पूर्णत्वाला गेले आहेत. जे काही 35 किलोमीटरचे काम आहे ते बीडपासून पुढे आहे. त्याचा पाठपुरावा खा. प्रीतम मुंडे करत आहे. लवकरच हा विषय मार्गी लागेल.

रेल्वे टेशनवर फडकला उंच तिरंगा
रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण अंतर्गत विविध कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत शनिवारी तेथे मोठा तिरंगा ध्वज खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते फडकला आहे. यावेळी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com