साकळाई योजनेच्या सर्वेक्षणासाठी खा. सुजय विखे यांचे साकडे
Featured

साकळाई योजनेच्या सर्वेक्षणासाठी खा. सुजय विखे यांचे साकडे

Sarvmat Digital

ना. जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर व श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरू शकणार्‍या साकळाई उपसा सिंचन योजनेबाबत सर्वेक्षण करण्यास शासनाने मंजुरी दिली असून त्याबाबतची कारवाई तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन केली. त्यावेळी त्यांच्या सोबत आ. निलेश लंके, आ. आशुतोष काळे उपस्थित होते.

साकळाई उपसा योजनेसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या बाबतचा निर्णय शासनाकडे प्रलंबित आहे. तत्कालीन युती सरकारच्या काळात कृष्णा पाणी तंटा लवादानुसार कुकडी खोर्‍यामध्ये अतिरीक्त तीन टीएमसी पाणी साकळाई योजनेसाठी वापर करता येईल. विसापूर धरणात ते पाणी आणून योजना कार्यान्वित करण्याचे ठरले होते.

साकळाई उपसा योजना मार्गी लागल्यास श्रीगोंदा आणि नगरमधील 35 गावांतील जनतेचा 23 वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागेल, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या 35 गावांतील जनतेची मागणी पाण्याची नसून पाझर तलाव, बंधारे आणि लघू पाट बंधारे वर्षातून एकदा भरून द्यावेत, एवढीच अपेक्षा असल्याचे खा. डॉ. विखे यांनी सांगितले.

साकळाई उपसा जलसिंचन योजना अनेक वर्ष प्रलंबित आहे. अनेकवेळा त्यासाठी मोठी आंदोलने झाली आहेत. त्यामुळे योजनेचे तातडीने सर्वेक्षण पूर्ण करणे, त्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याची मागणी खासदार डॉ. विखे पाटील यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लावकरच याबाबत अधिकार्‍यांची बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे खा. डॉ. विखे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com