महिन्यातच कांदा चाळी फोडण्याची ओढवली वेळ !

महिन्यातच कांदा चाळी फोडण्याची ओढवली वेळ !

कांदा खराब होण्याचे वाढले प्रमाण ; उत्पादन खर्चही निघत नसल्याचे वास्तव !

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- वाढती उष्णता, एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस याचा विपरीत परिणाम चालू वर्षी कांद्यावर झाला आहे. त्यामुळे साठवणुकीच्यादृष्टीने चाळीत भरलेला कांदा खराब होऊ लागल्याने अवघ्या एक महिन्याच्या आत कांदा चाळी फोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर ओढवली आहे. परिणामी मातीमोल भावात कांदा विक्री करून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कांदा पिकात गुंतवलेले भांडवल लॉक होऊन शेतकरी कर्जाच्या खाईत गेला आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. तसेच भंडारदरा, निळवंडे धरणही ओव्हरफ्लो झाले होते. त्यातच मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात कांदा दराने घेतलेली उसळी यामुळे तालुक्यात कांदा लागवडीने उच्चांकी गाठली होती. तर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपांचे नुकसान झाल्यानंतर अनेकांनी दुबार कांदा बियाणे टाकून कांदा लागवडीचेही ध्येय धरले होते. एकंदरितच मागील वर्षी कांदा लागवड व कांदा पेरणीचेही क्षेत्र वाढल्याचे दिसून आले.

एप्रिल महिन्यात उन्हाळी कांद्याची काढणी करण्यात आली. यावेळी उष्णतेचे प्रमाण जास्त होते. त्यातच दोन तीन वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक भागातील कांदा भिजला. मात्र लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने कांदा विक्री अभावी तसाच पडून राहिला. काही प्रमाणात शेतकर्‍यांनी जागेवर व्यापार्‍यांना कांदा विक्री केला. मात्र त्यानंतर कांदा दरातील घसरगुंडी सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी नाईलाजास्तव चाळी भरल्या. मात्र महिन्याच्या आताच अनेक शेतकर्‍यांनी भरलेल्या चाळी खराब झाल्या आहेत.

पर्यायाने 400 ते 500 रुपये मातीमोल भावात व्यापार्‍यांना कांदा विक्री करण्याची वेळ ओढावली आहे. तर यातील बहुतांशी कांदा शेतात फेकण्याची वेळ आली. तर ज्या शेतकर्‍यांचा कांदा काढणीच्या वेळेस भिजला त्यांनाही काढणी दरम्यान खराब झालेला कांदा फेकण्याची वेळ आली. यातून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
दरम्यान, सद्य स्थितीत लॉकडाऊनमुळे कांद्याचे पडलेले दर लक्षात घेता सध्या कांदा विक्री करून शेतकर्‍यांचा कांदा पिकात झालेला खर्चही निघत नसल्याचे वास्तव आहे. त्यात कांदा खराब होत असल्याने निम्म्यापेक्षा उत्पन्न वाया जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा चाळी भरण्यावर झालेला खर्चही वाया गेल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com