थोरातांच्या नकारानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी सतेज पाटील

jalgaon-digital
2 Min Read

मुश्रीफच नगरचे पालकमंत्री

मुंबई- कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नकार दिल्यानंतर त्या जागी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे. तसेच भंडारा जिल्ह्याची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारकडून या दोन नव्या पालकमंत्र्यांची काल घोषणा करण्यात आली. आठवडाभरापूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या यादीत शिवसेनेकडे 13, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 तर काँग्रेसकडे 11 पालकमंत्रीपदं आली होती.

दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, ते स्विकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री असलेले काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती. मात्र, यामध्ये अखेर सतेज पाटलांनी बाजी मारली.

सतेज पाटील यांनी गेल्या महिन्यात पालकमंत्री होणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्याला मुश्रीफ समर्थकांनी उत्तर देत आपला पालकमंत्री पदावर हक्क सांगितला होता. मात्र, सुरुवातीला प्रत्यक्षात पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले तेव्हा त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मुश्रीफ यांच्याकडे नगर जिल्ह्याचे तर सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याची जबाबदारी दिल्याने दोघांपासूनही कोल्हापूरचे पालकमंत्रिपद दूर राहिले होते.

मुश्रीफच नगरचे पालकमंत्री
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण हे पद घेण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे कोेल्हापूरचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ या पदाच्या रेसमध्ये होते. तसेच त्यांच्या समर्थकांनी नगर ऐवजी कोल्हापूरची जबाबदारी द्यावी अशी जोरदार मागणी केली होती. दरम्यान त्यांच्याकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण आता सतेज पाटलांकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आल्याने मुश्रीफच नगरचे पालकमंत्री कायम राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे ना. हसन मुश्रीफ लवकरच मुळा आणि भंडारदरा धरणाच्या आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेतील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *